नवी दिल्ली : भाजपचे माजी खासदार आणि अभिनेते परेश रावल यांची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे (एनएसडी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. एनएसडी अध्यक्षपदी नियुक्तीनंतर अभिनेते परेश रावल यांनी म्हटलं की, हे काम आव्हानात्मक पण मजेदार असेल. पुढील चार वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


एनएसडीने ट्वीट करत माहिती दिली की, "आम्हाला सांगताना आनंद होत आहे की, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रख्यात अभिनेते आणि पद्मश्री परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. एनएसडी कुटुंब त्यांचे स्वागत करत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली एनएसडी नवीन उंची गाठेल."





संस्कृती मंत्रालयाने ट्वीट करत म्हटलं की,, "प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेते आणि राष्ट्रीय पुरस्कार विजेते परेश रावल यांची एनएसडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केल्याबद्दल मनापासून अभिनंदन. त्यांच्या सक्षम नेतृत्वात एनएसडी नक्कीच नवीन उंचावर जाईल.''


परेश रावल भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर अहमदाबाद पूर्वमधून खासदार होते. परेश रावल यांनी आपल्या सिनेकारकिर्दिची सुरुवात 'होली' सिनेमातून केली होती. त्यानंतर बॉलिवूडमध्ये त्यांनी अनेक सिनेमांमध्ये विविध भूमिका साकारल्या. त्यांनी नुसत्या भूमिका साकारल्या नाहीत तर त्या भूमिकांना न्याय दिला. सिनेमांमध्ये खलनायक असो किंवा कॉमेडियन भूमिका प्रत्येकवेळी त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांच्या याच कामामुळे त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.