अंबाला (चंदीगड) : भारत आणि चीनमध्ये सीमेवर तणाव सुरु असतानाच आज (10 सप्टेंबर) भारतीय हवाई दलाची ताकद वाढली आहे. फ्रान्समधून आलेली पाच राफेल लढाऊ विमानं आज औपचारिकरित्या भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील झाली. अंबाला एअर बेसवर झालेल्या या कार्यक्रमा भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह फ्रान्सच्या संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली या देखील उपस्थित होत्या.


राफेल लढाऊ विमानांची भारतीय वायुदलातील एन्ट्री संपूर्ण प्रक्रियेसोबत झाली. सर्वात आधी सर्वधर्म पूजा करण्यात आली, त्यानंतर विमानांची प्रात्यक्षिकं करण्यात आली. यादरम्यान तेजस, सुखोईसह वायुदलाच्या इतर विमानांचा एअर शोमध्ये सहभाग होता. अखेरीस राफेल विमानांना वॉटर कॅनेन सॅल्यूट देण्यात आला. भारतीय हवाई दलात नवीन लढाऊ विमान सामील होतं त्यावेळी याच प्रक्रियेचं पालन होतं.



फ्रान्समधून 29 जुलै रोजी पाच राफेल लढाऊ विमान भारतात पोहोचले होते, परंतु अधिकृतरित्या आज त्यांचा हवाई दलात समावेश झाला. या सोहळ्यात अंबाला एअरबेसवर सीडीएस जनरल बिपिन रावत, वायुदल प्रमुख आर के एस भदौरियाही उपस्थित होते. वायुदलाला फ्रान्सकडून एकूण 36 राफेल विमानं मिळणार आहे, त्यामधील पहिल्या बॅचमध्ये पाच विमानं मिळाली असून आणखी पाच विमानं पुढील महिन्यात मिळण्याची शक्यता आहे.


वायु दलात राफेल लढाऊ विमानं ही गोल्डन एअरो 17 स्क्वॉड्रनमध्ये सामील केली जाणार आहेत. याच स्क्वॉड्रनने कारगिल युद्धात पाकिस्तानला पराभूत करण्यात महत्त्वाची भूमिका निभावली होती. आता पुन्हा एकदा अंबाला एअर बेसवरील राफेल विमानांची हजेरीच शत्रूला धडकी भरवू शकते.


सध्या चीन आणि पाकिस्तानसोबत भारताचा तणाव सुरु आहे. सीमेपासून अंबाला एअरबेस जवळ आहे. अशा स्थितीत डावपेचानुसार राफेलची तैनाती भारतासाठी उपयोगाची ठरेल.



राफेल लढाऊ विमानाची वैशिष्ट्ये


1. राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती.


2. हे विमान एका मिनिटात 60 हजार फूट उंचीपर्यंत जाऊ शकतं. याची इंधन क्षमता 17 हजार किलो आहे.


3. राफेल विमान हरतऱ्हेच्या हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.


4. यामध्ये स्काल्प मिसाईल आहे, जे हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे.


5. राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरपर्यंत आहे, तर स्काल्पची रेंज 300 किलोमीटर आहे.


6. हे अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज मिसाईल अॅटॅकमध्येही अव्वल आहे.


7. राफेल विमान 24,500 किलोपर्यंत वजन घेऊन जाऊ शकतं आणि 60 तासांचं अतिरिक्त उड्डाणही करु शकतं.


8. राफेल विमानाचा वेग 2,223 किलोमीटर प्रति तास आहे.


संबंधित बातम्या


Rafale Fighter Jet | भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार, राफेल विमानं ताफ्यात सामील होणार!


राफेल विमानांचं भारतीय भूमीवर सुरक्षित लॅण्डिंग, अंबाला एअरफोर्स स्टेशनमध्ये दाखल


शत्रूला धडकी भरवण्याठी राफेल येतंय....29 जुलैला भारतात दाखल होणार!


Rafale | राफेल विमान भारताला सुपूर्द, पहिल्या राफेल विमानातून संरक्षणमंत्र्यांचं उड्डाण


राफेल विमान आज भारताला मिळणार, राफेलची वैशिष्ट्ये काय?