नवी दिल्ली : लहान मुलांच्या आवडत्या कार्टूनवर मोठ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. टीव्हीवरील डोरेमॉन आणि शिन चॅन या लोकप्रिय कार्टूनविरोधात सरकार आणि चॅनलच्या संस्थेकडे तक्रार करण्यात आली आहे. ग्वाल्हेरचे आरटीआय कार्यकर्ते आशिष चतुर्वेदी यांनी कायदेशीर नोटीस पाठवून हे कार्यक्रम बंद करण्याची मागणी केली आहे.


 

तक्रार का केली?

डोरेमॉन आणि शिन चॅन हे कार्टून कॅरेक्टर लहान मुलांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. त्यापैकी डोरेमॉन नोबिताच्या अडचणी चुटकीसरशी सोडवतो. तर शिन चॅन त्याच्या खोडसाळपणामुळे आई-वडिलांना त्रास देत असतो. डोरेमॉनमधील नोबिता कधीही आई-वडिलांचं ऐकत नाही. यामुळे मुलांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. तर अशाचप्रकारे शिन चॅनही त्याच्या आई-वडिलांची थट्टा करतो, असं चॅनल आणि सरकारला पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

 

साडेतीन कोटी मुलांवर परिणाम

आशिष चतुर्वेदींच्या म्हणण्यानुसार, व्यापम घोटाळा तर दो-तीन राज्यांमध्ये पसरला होता. पण दररोज कार्टून पाहणाऱ्या साडेतीन कोटी मुलांपैकी निम्म्याहून अधिक मुलं डोरेमॉन आणि शिन चॅन पाहतात.

 

आशिष चतुर्वेदी यांनी या कार्टून्सचं प्रसारण करणाऱ्या डिज्ने इंडिया, हंगामा टीवी चॅनलसह, आयबीएफ, माहिती आणि प्रसारण मंत्रालय, महिला आणि बाल करण्या मंत्रालयला कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

 

कोण आहे आशिष चतुर्वेदी?

मध्य प्रदेशातील कुख्यात व्यापम घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यात आशिष चतुर्वेदी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सायकल वापरणाऱ्या आशिष चतुर्वेदी यांना पोलिस सुरक्षा देण्यात आली आहे, कारण त्यांच्यावर चौदा हल्ले झाले आहेत.

 

मुलांवर कार्टूनचा मोठा परिणाम

मुलांची बदलती वागणूक पाहता मानसोपचारतज्ज्ञ जीतेंद्र नागपाल सांगतात की, मुलांवर कार्टूनचा परिणाम मोठ्या काळापर्यंत राहतो. यामुळे मुलं आक्रमक होत आहेत.

 

आई-वडिलांचा कमी वेळ आणि सातत्याने टीव्ही पाहणं यामुळे त्यांच्या नकारात्मक भावना निर्माण होते. मुलं आता लवकरच चिडचिड करतात. त्यांच्यात एकटं राहण्याची प्रवृत्तीही वाढते.

 

कोणत्या देशांमध्ये बंदी?

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2008 मध्ये शिन चॅनवर बंदी घातली होती. आक्षेपार्ह संवादांमुळे शिन चॅनवर अनेक देशांमध्ये बंदी लावली होती.

 

2013 मध्ये बांगलादेशातही डोरेमॉनवर बंदी घातली होती. यातील पात्र खोटं बोलतात, असं सांगून ही बंदी घालण्यात आली होती. याशिवाय चीन, अमेरिका, मेक्सिको, रशिया, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, ब्राझील, अर्जेंटिना, इस्रायल यांसारख्या सुमारे 50 देशांध्ये डोरेमॉन आणि शिन चॅनवर बंदी घातली आहे.