मुंबई : पनामा पेपर प्रकरणानंतर आता पॅराडाईज पेपर्समध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. पॅराडाईज पेपर्समध्ये 1.34 कोटी कागदपत्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये भारतासह जगभरातील श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या काळ्या धनाची यात माहिती देण्यात आली आहे.
पनामा पेपर प्रकरणानंतर आता पॅराडाईज पेपर्समध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. पॅराडाईज पेपर्समध्ये 1.34 कोटी कागदपत्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये भारतासह जगभरातील श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या काळ्या धनाची यात माहिती देण्यात आली आहे.
जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने जगातील 96 नामांकित माध्यमसमुहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा केला. यामध्ये भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’चा समावेश होता. कर बुडवेगिरी करुन तो पैसा देशाबाहेरील बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणाऱ्या भारतीय व्यक्तींची नावं यातून समोर आली आहेत.
पत्रकारांना या सर्व प्रकरणाचा शोध घेण्यासाठी 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. यातील सर्वाधिक कागदपत्रे ही अॅपलबाय या विधीविषयक संस्थेशी संबंधित आहेत. 119 वर्षे जुनी असलेली ही कंपनी म्हणजे वकील, अकाऊंटंट्स, बँकर्स आणि अन्य लोकांचं मोठं नेटवर्क आहे. या संस्थेकडून भारतासह जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींचा पैसा ‘मॅनेज’ केला जातो. करचोरी केलेला पैसा देशाबाहेर पाठवून काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करणाऱ्या भारतीयांची संख्या 714 एवढी असून भारत जगात 19 व्या क्रमांकावर आहे.
या पेपर्समध्ये महाराणी एलिजाबेथ द्वितीय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही मंत्र्यांसह जगभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावं आहेत. भारतातील 714 व्यक्तींची नावं यामध्ये आहेत. या सर्वांनी परदेशातील कंपन्या आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैसा लपवला आहे.
अहवालात ज्या 180 देशांचा डेटा देण्यात आला आहे, त्यामध्ये भारत 19 व्या स्थानावर आहे. मोदी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी गेल्या वर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या दोन दिवस अगोदरच हा अहवाल समोर आला आहे. 8 नोव्हेंबर हा दिवस सरकारकडून काळेधन विरोधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच पनामा पेपर प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचंही नाव होतं. त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.
भारतात कुणाकुणाची नावं?
मान्यता दत्त
अभिनेता संजय दत्तची पत्नी मान्यता दत्तचं नाव या कागदपत्रांमध्ये आहे. दिलनिशान संजय दत्त असं तिचं नाव आहे. मान्यता दत्त संजय दत्तचं प्रोडक्शनच्या संचालकीय मंडळावर आहे. यासोबतच अनेक इतर कंपन्यांच्या संचालकीय मंडळात मान्यता दत्तचा समावेश आहे. बहामास येथील रजिस्ट्रीच्या कागदपत्रांमध्ये नासजय कंपनी लिमिटेडचं नाव आहे, ज्याची संचालक, व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि कोषाध्यक्ष मान्यता दत्त एप्रिल 2010 मध्ये होती.
दरम्यान आयकर कायद्यानुसारच सर्व प्रक्रिया पार पडलेली आहे. कंपन्यांचे सर्व शेअर्स, मालमत्ता ताळेबंदामध्ये जाहीर केलेलं आहे, असं स्पष्टीकरण मान्यता दत्तच्या प्रवक्त्याने ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिलं आहे.
पवितार सिंह उप्पल
जालंधरमधील बांधकाम व्यवसायिक पवितार सिंह उप्पल यांचे डॉमिनिका येथील कंपनीशी संबंध असल्याचं कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे. सिल्वर लाईन इस्टेट लिमिटेड या कंपनीचे डॉमिनिकाशी संबंध होते, ज्याचे संचालक उप्पल होते. मात्र डॉमिनिकात राहणाऱ्या आपल्या मेहुण्याने या कंपनीला आपलं नाव दिलं होतं, असा दावा उप्पल यांनी केला आहे. अधिक माहिती आपण नंतर देऊ, असं त्यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं
रविश भदाना, नेहा शर्मा, मोना कलवानी
कोटा येथईल रविश भदानाचे पॅराडाईज पेपर्सच्या कागदपत्रांमध्ये नाव आहे. माल्टामध्ये रविश भदानाचे आर्थिक संबंध असल्याचं समोर आलं आहे. वैमानिक होण्याचा बनावट परवाना देण्यासंबंधी घोटाळ्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी भदानावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर भदाना फरारही होता.
माल्टा येथील दोन कंपन्यांचा संचालक, शेअरहोल्डर, कायदेशीर प्रतिनिधी अशा पदांवर भदानाचं नाव आहे. दोन्हीही कंपन्यांचे नोंदणी क्रमांक वेगवेगळे आहेत. याच कंपन्यांमध्ये याच पदावर गाझियाबादमधील नेहा शर्मा आणि मोना कलवानी या होत्या, असं कागदपत्रांमध्ये म्हटलं आहे.
रविश भदाना सध्या दिल्ली आणि जयपूर या वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यांच्याशी सध्या संपर्क नाही, अशी माहिती भदाना कुटुंबीयांनी इंडियन एक्स्प्रेसला दिली.
अल्पना कुमार, अर्चना कुमारी, अंजना कुमारी
पॅराडाईज पेपर्सच्या कागदपत्रांमध्ये या तिघींचे नाव समोर आले आहेत. बर्मुडामध्ये यांचे आर्थिक संबंध असल्याचं समोर आलं आहे.
दीपेश राजेंद्र शाह
मुंबई येथील दीपेश शाहचे माल्टा येथे आर्थिक संबंध असल्याचं पॅराडाईज पेपर्सच्या कागदपत्रांमधून समोर आलं आहे.
(नोट : संबंधित वृत्त इंडियन एक्स्प्रेससह जगभरातील माध्यम संस्थांनी केलेल्या तपासाच्या अहवालावर देण्यात आलं आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस’सह देशभरातील 90 माध्यम संस्थांनी 180 देशांमधून ही कागदपत्र मिळवली आहेत. ‘इंटरनॅशनल कंसोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट’ने हे प्रकरण समोर आणलं आहे.)
पॅराडाईज पेपर्स : कागदपत्रांमध्ये मान्यता दत्तसह धनदांडग्यांची नावं
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2017 10:23 AM (IST)
भारतासह जगभरातील श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या काळ्या धनाची यात माहिती देण्यात आली आहे.
संजय दत्त आणि मान्यता
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -