नवी दिल्ली : पनामा पेपर प्रकरणानंतर आता पॅराडाईज पेपर्समध्ये एक मोठा खुलासा झाला आहे. पॅराडाईज पेपर्समध्ये 1.34 कोटी कागदपत्रांचा समावेश आहे. ज्यामध्ये भारतासह जगभरातील श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या काळ्या धनाची यात माहिती देण्यात आली आहे.
काय आहे पॅराडाईज पेपर प्रकरण?
जर्मनीतील ‘सुददॉइश झायटुंग’ या वृत्तपत्राच्या पुढाकाराने जगातील 96 नामांकित माध्यमसमुहांनी ‘पॅराडाईज पेपर्स’चा खुलासा केला. यामध्ये भारतातील ‘इंडियन एक्स्प्रेस’चा समावेश होता. कर बुडवेगिरी करुन तो पैसा देशाबाहेरील बोगस कंपन्यांमध्ये गुंतवणाऱ्या भारतीय व्यक्तींची नावं यातून समोर आली आहेत.
पत्रकारांना या सर्व प्रकरणाचा शोध घेण्यासाठी 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला. यातील सर्वाधिक कागदपत्रे ही अॅपलबाय या विधीविषयक संस्थेशी संबंधित आहेत. 119 वर्षे जुनी असलेली ही कंपनी म्हणजे वकील, अकाऊंटंट्स, बँकर्स आणि अन्य लोकांचं मोठं नेटवर्क आहे. या संस्थेकडून भारतासह जगभरातील श्रीमंत आणि सामर्थ्यशाली व्यक्तींचा पैसा ‘मॅनेज’ केला जातो. करचोरी केलेला पैसा देशाबाहेर पाठवून काळ्या पैशाचं रुपांतर पांढऱ्या पैशात करणाऱ्या भारतीयांची संख्या 714 एवढी असून भारत जगात 19 व्या क्रमांकावर आहे.
कागदपत्रांमध्ये कुणाकुणाचा समावेश?
या पेपर्समध्ये महाराणी एलिजाबेथ द्वितीय, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे काही मंत्र्यांसह जगभरातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींची नावं आहेत. भारतातील 714 व्यक्तींची नावं यामध्ये आहेत. या सर्वांनी परदेशातील कंपन्या आणि बनावट कंपन्यांच्या माध्यमातून पैसा लपवला आहे.
अहवालात ज्या 180 देशांचा डेटा देण्यात आला आहे, त्यामध्ये भारत 19 व्या स्थानावर आहे. मोदी सरकारने काळा पैसा रोखण्यासाठी गेल्या वर्षी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्याला एक वर्ष पूर्ण होण्याच्या दोन दिवस अगोदरच हा अहवाल समोर आला आहे. 8 नोव्हेंबर हा दिवस सरकारकडून काळेधन विरोधी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे.
काही दिवसांपूर्वीच पनामा पेपर प्रकरण समोर आलं होतं. ज्यामध्ये पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचंही नाव होतं. त्यांचं नाव आल्यानंतर त्यांना पदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं.
पॅराडाईज पेपर्स : परदेशात काळा पैसा लपवणारे 714 भारतीय कोण?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Nov 2017 08:45 AM (IST)
भारतासह जगभरातील श्रीमंत आणि शक्तीशाली व्यक्तींचा समावेश आहे. त्यांच्या काळ्या धनाची यात माहिती देण्यात आली आहे.
प्रातिनिधिक फोटो
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -