रोजच्या वापरातील वस्तूंवरील जीएसटी घटण्याची शक्यता
एबीपी माझा वेब टीम | 05 Nov 2017 11:22 PM (IST)
हातानं बनवलेलं फर्निचर, प्लास्टिक उत्पादनं, शाम्पू यासारख्या वस्तूंवरील कराबाबत फेरविचार होणार आहे.
नवी दिल्ली : पुढच्या आठवड्यात आयोजित जीएसटी परिषदेच्या बैठकीत दैनंदिन वापरातील वस्तूंवर आकारला जाणारा जीएसटी कमी करण्याबाबत विचार होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली 10 नोव्हेंबरला बैठक होणार आहे. हातानं बनवलेलं फर्निचर, प्लास्टिक उत्पादनं, शाम्पू यासारख्या वस्तूंवरील कराबाबत फेरविचार होणार आहे. सध्या दैनंदिन वापराच्या अनेक वस्तूंवर तब्बल 28 टक्के जीएसटी लावला जातो. परिणामी या महागल्याने लघु आणि मध्यम उद्योजकांचे खूप नुकसान होत आहे. जीएसटीचा मोठा फटका बसलेल्या उद्योगातील करप्रणाली तर्कसंगत करण्यासाठी काम केलं जात आहे. या उद्योगांना जीएसटी येण्याअगोदरपासूनच मूल्यवर्धित कर, उत्पादन शुल्कातली दरात सूट आदी गोष्टींमुळे त्रास सहन करावा लागत होता. एक जुलैपासून देशभरात जीएसटी लागू झाला आहे. तेव्हापासून दर महिन्याला जीएसटी परिषद बैठक घेते.