नवी दिल्ली : मेवाती सांगितिक घराण्याचे ज्येष्ठ शास्त्रीय गायक संगीत मार्तंड जसराज यांचे न्यू जर्सी येथे ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 90 वर्षांचे होते. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण या किताबांसह संगीत नाटक अकादमीच्या फेलोशिपनेही त्यांचा गौरव करण्यात आला होता. त्यांच्या निधनाने शास्त्रीय संगीतातील क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
पंडित जसराज यांनी वयाच्या 10 व्या वर्षापासून संगीतसाधनेला सुरूवात केली. भोपाळमध्ये जन्म झाल्यानंतर ते लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचा सांभाळ त्यांच्या ज्येष्ठ बंधूने केला. लहान वयात गानतपस्या करून त्यांनी गाण्यावर प्रभूत्व मिळवले. भारतासह अमेरिका, कॅनडा येथे त्यांचे अनेक शिष्य आहेत. भारतात पं. संजीव अभ्यंकर, कला रामनाथ आदी शिष्य त्यांनी घडवले आहेत.
आंतरराष्ट्रीय खगोलीय संघाने 11 नोव्हेंबर 2006 मध्ये '2006 व्हीपी 32' या छोट्या ग्रहाला पंडितजसराज असं नाव देऊन जसराज यांचा गौरव केला होता.