नवी दिल्ली : परदेशात अनेक भारतीयांनी काळा पैसा लपवल्याचं पनामा पेपर्समधून समोर आल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कारवाईचं आश्वासन दिलं आहे.

 

पनामाच्या मोझॅक फोन्सेका कंपनीचे एक कोटी दहा लाख गोपनीय दस्तऐवजी लीक झाले आहेत. मेझॅक फोन्सेकाने कशाप्रकारे आपल्या ग्राहकांचे कर वाचवण्यात, कर चोरी करण्यात, काळा पैसा पांढरा करण्यात आणि नियामातून वाचवण्यात कशाप्रकारे मदत केली, याचा खुलासा या दस्तऐवजांमध्ये झाला आहे.

 

अवैधरित्या परदेशात पैसा ठेवणाऱ्यांवर कारवाई होणारच, असं भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं आहे. पंतप्रधानांच्या सल्ल्यावर अनेक यंत्रणांचा ग्रुप बनवला असून त्यामध्ये सीबीडीटी, एफआययू, आरबीआय, एफटी आणि टीआरचा समावेश आहे. या यंत्रणांची पनामा पेपर्सच्या माहितीवर नजर असून कारवाई केली जाईल, असंही जेटली म्हणाले.

 

पनामा पेपर्स लीक, ब्लॅकमनी साठवण्याच्या रॅकेटचा पर्दाफाश


 

अरुण जेटली यांनी पनामा पेपर्स लीक झाल्याचं स्वागत केलं आहे. मी अशा तपासाचा आणि पर्दाफाशचं स्वागत करतो, असं जेटलींनी सांगितलं.

 

जगभरातल्या पत्रकारांनी मिळून पनामा पेपर्स या नावाने ब्लॅकमनी साठवण्याच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पत्रकारितेच्या इतिहासातील हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट मानला जातोय. पनामा पेपर्स या नावाने हा गौप्यस्फोट आज जगातील सर्वात मुख्य चर्चेचा विषय आहे.

 

पनामा पेपर्समध्ये कोणाची नावं?

 

दरम्यान, जगभरातील अतीश्रीमंत सत्ताधीश, राजकारणी आणि उद्योगपती यांनी आपला ब्लॅकमनी कसा परदेशी पाठवला आहे, याचा खुलासा या पनामा पेपर्समधून करण्यात आला आहे. जगभरातील हुकूमशहा आणि सत्ताधीशांच्या यादीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांचंही नाव आहे. त्याशिवाय युक्रेनचे अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को, इजिप्तचे माजी अध्यक्ष होस्नी मुबारक, लिबियाचे मोहम्मद गडाफी, सिरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचा समावेश आहे.

 

त्याचबरोबर भारतात बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन,  डीएलएफचे केपी सिंह, इक्बाल मिर्ची आणि उद्योगपती अडाणी यांच्या ज्येष्ठ बंधूचा पनामा पेपर्समध्ये समावेश असल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे.

 

पनामा पेपर्स काय आहे?

 

पनामा पेपर्स काल रात्रीपासून ट्वीटरसह अन्य सोशल मीडियावर जगभरात टॉप ट्रेडिंगमध्ये आहे. सर्व आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये आज हाच विषय प्रामुख्याने चर्चिला जात आहे.

 

पनामा येथील एका लॉ फर्मचे काही गोपनीय कागदपत्रे लीक करण्यात आली आहेत, त्यामुळे जगभरातील अतिश्रीमंत, बडे राजकारणी, देशांचे प्रमुख त्यांच्याकडील ब्लॅकमनी कसा सुरक्षित ठेवतात किंवा विदेशात पाठवतात याचा उल्लेख आहे. जगभरात व्हिसल ब्लोअर म्हणून चर्चेत आलेल्या एडवर्ड स्नोडेन यानेही हा आजवरचा सर्वात मोठा गौप्यस्फोट असल्याचा दावा केलाय. हा गौप्यस्फोट करण्यात एडवर्ड स्नोडेनचा मात्र काही सहभाग नाही.

 

11 दशलक्ष म्हणजे तब्बल एक कोटी दहा लाख पानांचा गोपनीय दस्तावेज या शोध पत्रकारांच्या हाती लागलेत. गेले वर्षभर जगभरातील अनेक शोध पत्रकार या मोहीमेवर काम करत होते. परदेशी पैसे पाठवणं हे बेकायदेशीर नाही, मात्र काही देशांचे प्रमुखच जेव्हा त्यांच्याकडील अतिरिक्त पैसा असा विदेशात छुप्या मार्गाने पाठवतात, तेव्हा नक्कीच संशयास्पद आणि आक्षेपार्ह असतं.

 

यामध्ये 128 राजकारणी आणि बडे अधिकारी यांच्यासह तब्बल 12 देशांचे प्रमुखांचीही नावे आहेत.