लखनौ : 'तुमच्यावर हुकूमत गाजवणारे, कोणे एके काळी तुमच्या चपला साफ करायचे' असं वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी उत्तर प्रदेश भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रमुख मधू मिश्रा यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
'आज तुमच्या डोक्यावर बसून संविधानाच्या सहाय्याने जे हुकमत गाजवत आहेत, ते कोणे एके काळी तुमच्या चपला साफ करायचे, हे विसरु नका. आपण विभागलो गेल्यामुळे हे झालं आहे.' असं मधू मिश्रा उत्तर प्रदेशच्या अलिगडमधील एका रॅलीमध्ये म्हणाल्या. मिश्रा यांच्या जातीयवादी वक्तव्याची तातडीने दखल वरिष्ठांतर्फे घेण्यात आली. त्यानंतर सहा वर्षांसाठी त्यांची भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
'पूर्वीच्या काळी आम्हाला ते शेजारी बसलेलेही चालत नसत, मात्र आज आमची मुलं त्यांना हुजूर म्हणत असतील' असंही मिश्रा यांनी म्हटलं. त्यानंतर उत्तर प्रदेश भाजप अध्यक्ष लक्ष्मीकांत बाजपेयी यांनी कारवाई करत मधू मिश्रा यांना पदावरुन हटवलं. आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास आपण माफी मागतो, मात्र आपण भूमिकेवर ठाम आहोत, असं मिश्रा यांनी 'एबीपी'शी बोलताना सांगितलं.
उत्तर प्रदेशात 2017 मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून राज्यात 403 जागांसाठी रणसंग्राम होईल.