भारतावर आण्विक हल्ला करण्याची इम्रान खान यांची पुन्हा एकदा धमकी
भारतात ज्या प्रकारची हुकूमशाही सुरु आहे ती साधारण गोष्ट नाही तर यामागे असाधारण अशी विचारधारा असल्याचं इम्रान खान म्हणाले.
मुंबई: फ्रान्समधील जी-7 शिखर संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्रान्समध्ये भेटले आणि नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांच्या समोर काश्मीरचा मुद्दा हा भारत आणि पाकिस्तानमधला विषय असल्याचं स्पष्ट केलं. यावर ट्रम्प यांनी असं म्हटलं की दोन्ही देशाचं पंतप्रधान चांगले आहेत आणि भारत-पाकिस्तान हा विषय आपसात सोडवू शकतील. आतापर्यंत मध्यस्थी करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक माघार घेऊन यूटर्न घेतल्याची ही गोष्ट पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खान यांना सहन झाली नाही.
काश्मीरसंदर्भात मुस्लिम देशांचा पाकिस्तानला पाठिंबा आहे, हा विषय ते चर्चा करुन सोडवू इच्छितात, मात्र पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून हल्ला केला जाऊ शकतो इम्रान खान यांनी म्हटलं. इतकंच नाही तर पुन्हा एकदा इम्रान यांनी भारतावर अण्विक हल्ला करण्याची पोकळ धमकीही दिली. काश्मीरसाठी आम्ही कुठलीही पातळी गाठू असं त्यांनी म्हटलं. जर हा मुद्दा चर्चा न करता युद्धपातळीवर गेला तर दोनही देशांकडे लढण्यासाठी अण्वस्त्रांचा साठा आहेच, जगाने साथ दिली वा नाही दिली पाकिस्तान कोणत्याही पातळीवर जाऊ शकतं, हे इम्रान खान यांचे शब्द होते.
इम्रान भारतातील काही विषयांवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. "आरएसएसच्या नजरेत मुसलमानांसाठी फक्त द्वेष आहे, त्यांचं लक्ष्य हे फक्त हिंदू राष्ट्र स्थापन करण्यावर आहे, याच लोकांनी महात्मा गांधींची हत्या केली होती" असं इम्रान खान यांनी म्हटलं. भारतात ज्या प्रकारची हुकूमशाही सुरु आहे ती साधारण गोष्ट नाही तर यामागे असाधारण अशी विचारधारा असल्याचं इम्रान खान म्हणाले.
डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, पाकिस्तानला झटका
फ्रान्सच्या बेलारित्जमध्ये जी-7 परिषद आयोजित करण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींसमोरच मध्यस्थीच्या मुद्द्यावर यूटर्न घेतला. काश्मीर मुद्द्यावरुन भारत-पाकप्रश्नी मोदींनी "तुम्ही कष्ट घेऊ नका" असं सांगितलं. त्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी ओके म्हणत दोन्ही देशांचे पंतप्रधान त्यांचे प्रश्न चर्चेतून सोडवण्यास समर्थ आहेत, अशी जोड देत ट्रम्प यांनी अमेरिकेच्या मध्यस्थीच्या आशेवर बसलेल्या पाकला जोरदार दणका दिला.