भारतीय लष्काराच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान सैन्याच्या तीन हेरगिरी करणाऱ्या हेलिकॉप्टरनी एलओसीवर घुसखोरी केली. दोन्ही देशांच्या सीमेपासून जवळपास 300 मीटर अंतरापर्यंत येऊन ते परतले. यानंतर भारतीय लष्कराकडून हेलिकॉप्टरवर गोळीबार करण्यात आला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्काराचे हे हेलिकॉप्टर बराचकाळ घिरट्या घालत होतं. हे तिन्ही हेलिकॉप्टर पाकिस्तानी सेनेच्या MI-17 चे असल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितलं.
पाकच्या या कुरापतीमुळे त्यांनी सर्व आंतरराष्ट्रीय नियम पायदळी तुडवले आहेत. कारण, दोन्ही देशांमध्ये झालेल्या करारांनुसार, सीमेपासून जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत कोणत्याही देशाचं हेलिकॉप्टर उडवण्याची परवानगी नाही. तसेच लढाऊ विमानांना हे अंतर 10 किलोमीटर पर्यंतच आहे.
हे तिन्ही हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या चौक्यांची हेरगिरी करण्यासाठी एलओसीजवळ आल्याचे शंका व्यक्त होत आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचं उल्लंघन होत आहे.