Pahalgam Terror Attack: भारत पाकिस्तान वाढत्या संघर्षात अमेरिकेची एन्ट्री; परराष्ट्र खात्याची प्रतिक्रीया, म्हणाले, 'संपूर्ण जगाचं लक्ष...'
Pahalgam Terror Attack USA: पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. युद्धाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या दोन्ही देशांच्या तणावात आता अमेरिकेची एन्ट्री झालीय.

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीरमध्ये 22 एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात तणावाची परिस्थती कायम आहे. पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानची आर्थिक कोंडी, आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण झाल्याने पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. भारताच्या कारवायांमुळे बिथरलेल्या पाकिस्तानने युद्धाच्या धमक्या द्यायला सुरुवात केलीय. आपल्या सैन्याला तयार राहण्याचे आदेश पाकिस्तानने आपल्या सैनाला दिलेत. दरम्यान, भारतही कोणतीही कारवाई करण्यासाठी तयार असल्याचं सांगितलं जात असताना भारत आणि पाकिस्तानच्या या संघर्षात आता अमेरिकेची एन्ट्री झालीय. अमेरिकेने भारत आणि पाकिस्तान या दोघांशी चर्चा केली असून हा मु्द्दा चर्चेद्वारे सोडवला पाहिजे अशी प्रतिक्रीया अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दिलीय. (United States of America)
अमेरिका सध्या भारत आणि पाकिस्तान दोघांच्या संपर्कात असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या. अमेरिका दोन्ही देशांच्या संपर्कात असून अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी मला याबद्दल एक नोटही दिली आहे. त्यामुळे आम्ही काश्मीरच्या स्थितीबाबत भारत आणि पाकिस्तानशी संपर्क करत असल्याचंही त्यांनी म्हटलंय.
अमेरिकेची भारत पाकिस्तानशी चर्चा
अमेरिकेने भारत आणि पाकिस्तानला परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांना लवकरच भारत आणि पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोलण्याची शक्यता आहे. ते इतर राष्ट्रीय नेत्यांना आणि परराष्ट्र मंत्र्यांना या मुद्द्यावर दोन्ही देशांशी संपर्क साधण्यास सांगत आहेत.
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस म्हणाल्या, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करतील. आम्ही त्या प्रदेशातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत आणि तुम्हाला माहिती आहेच की, आम्ही अनेक पातळ्यांवर भारत आणि पाकिस्तानच्या सरकारांशी संपर्कात आहेात. आम्ही निश्चित सर्व पक्षांना योग्य तोडगा काढण्यासाठी एकत्र काम करण्यास प्रोत्साहन देत आहोत. संपूर्ण जगाचे भारत आणि पाकिस्तानाकडे लक्ष असल्याचंही त्या म्हणाल्या.
भारत पाकिस्तानात सध्या काय हलचाली?
पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशातील तणाव वाढला आहे. अशातच पाकिस्तानी लष्कराने सीमेवर हालचाली वाढवल्यामुळे, भारतीय हवाई दलाला आदेश येताच दोन मिनिटांच्या आत कारवाईसाठी सज्ज होण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. भारत व पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्करी सज्जतेच्या दृष्टीने हे पाऊल उचलण्यात आल्याची माहिती आहे. पाकिस्तानकडून नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर अधिक संख्येने तोफा आणण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोणतीही कारवाई करण्यास लष्कर सज्ज आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली असल्याचे कळते. त्यांनी सोमवारी पंतप्रधानांची भेट घेऊन जवळपास 40 मिनीटे चर्चा केली. काश्मीरमधील स्थितीबाबत त्यांनी पंतप्रधानांना माहिती दिली.
हेही वाचा:























