नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिन अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच 'पद्म' पुरस्कारांच्या संभाव्य मानकरींच्या नावांची चर्चा सुरु झाली आहे. ऑलिम्पिक पदक विजेत्या पीव्ही सिंधू, साक्षी मलिक, पॅरालिम्पिकपटू दीपा मलिक, गुगलचे सर्वेसर्वा सुंदर पिचाई, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नावं आघाडीवर आहेत.

पीव्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा मलिक, सुंदर पिचाई यांच्यासोबतच मायक्रोसॉफ्टचे प्रमुख सत्या नाडेला, भारतीय वंशाचे अमेरिकन गव्हर्नर निक्की हॅले यासारख्या व्यक्तिमत्त्वांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. 1730 नामांकनांतून 150 नावांची यादी करण्यात आली आहे.

मनोरंजन क्षेत्रातून ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख, अभिनेते ऋषी कपूर, गायक शंकर महादेवन, सोनू निगम, कैलाश खेर, अभिनेता मनोज बाजपेयी यांच्या नावाची चर्चा आहे. सरकारकडून या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

राजकीय क्षेत्रात दबदबा असलेले ज्येष्ठ नेते शरद पवार आणि भाजपचे दिग्गज नेते मुरली मनोहर जोशी यांच्याही नावाची चर्चा आहे. फक्त राज्यातीलच नाही, तर देशभरातील राजकारणातला पवारांचा वरचष्मा सर्वश्रुत आहे. पवारांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत सर्वपक्षीय उपस्थित होते.

पद्म पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेक वेळा वाद निर्माण होतात. त्यामुळे जनक्षोभ टाळण्यासाठी आणि निवड प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी सामान्य जनतेने पद्म मानकरींना नामांकन द्यावं, अशी पद्धत सुरु झाली.

1954 पासून 4 हजार 329 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न या सन्मानांचा समावेश आहे. नवी दिल्लीतून सर्वाधिक म्हणजे 797 जणांना सन्मानित करण्यात आलं आहे, तर त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक (756) लागतो.