नवी दिल्ली: 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये त्यामध्ये सहा पद्मविभूषण, नऊ पद्मभूषण आणि 91 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत नेते मुलायमसिंह यादव यांना मरणोपरांत पद्म विभूषण पुरस्कार तर राकेश झुनझुनवाला यांना मरणोपरांत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
मुलायम सिंह यांचे 10 ऑक्टोबर 2022 रोजी निधन झालं होतं. तर शेअर बाजारातील बिग बुल अशी ओळख असलेल्या राकेश झुनझुनवाला यांचं 14 ऑगस्ट 2022 रोजी निधन झालं होतं. या दोन्ही व्यक्तीच्या कार्याची दखल घेत सरकारने त्यांना आता पद्म पुरस्कार जाहीर केला आहे.
मुलायम सिंह यादव यांचा राजकीय प्रवास
मुलायम सिंह यादव हे समाजवादी पक्षाचे संरक्षक होते. त्यांनी तीन वेळा उत्तर प्रदेशचं मुख्यमंत्री पद भूषवलं होतं. तसेच ते देशाचे संरक्षण मंत्री राहिले होते. उत्तर प्रदेश विधानसभेतून ते आठवेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तसेच लोकसभेवर सात वेळा निवडून आले होते. मुलायम सिंह एकदा विधानपरिषदेवरही निवडून गेले होते.
मुलायम सिंह यादव 1967 मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 1977 मध्ये जनता पक्षाच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मंत्री झाले. लोकदल, लोकदल (ब) आणि जनता दलाच्या यूपी युनिटचे प्रदेशाध्यक्ष होते. 1982 ते 1985 पर्यंत ते विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते होते. 1985 ते 1987 पर्यंत उत्तर प्रदेश विधानसभेत विरोधी पक्षनेते होते. 1989 मध्ये पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले.
मुलायम सिंह यादव यांनी 4 ऑक्टोबर 1992 रोजी समाजवादी पक्षाची स्थापना केली. 1993 ते 1995 या काळात ते दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 1996 मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले.1996 ते 1998 या काळात ते देशाचे संरक्षण मंत्री होते. ऑगस्ट 2003 ते मे 2007 पर्यंत ते तिसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 14 मे 2007 ते 15 मे 2009 या काळात ते विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते. मुलायम सिंह यादव 2004, 2009, 2014 आणि 2019 मध्ये लोकसभेवर निवडून गेले.
राकेश झुनझुनवाला यांचा जीवनप्रवास
राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जुलै 1960 रोजी झाला. मुंबईतील सिडनहॅम महाविद्यालयातून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते चार्टर्ड अकाऊंटंटही झाले. महाविद्यालयीन जीवनापासून राकेश झुनझुनवाला यांचा ओढा शेअर बाजाराकडे होता. अवघ्या पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीने त्यांनी बाजारातील व्यवहाराला सुरुवात केली. राकेश झुनझुनवाला यांनी बाजारातील व्यवहाराला सुरुवात केली होती तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 150 अंकाच्या आसपास होता. सध्या सेन्सेक्स 60 हजार अंकांच्या आसपास व्यवहार करत आहे.
राकेश झुनझुनवाला हे सक्रिय गुंतवणूकदार असण्यासोबत एक यशस्वी उद्योजक-व्यावसायिक होते. झुनझुनवाला हे अॅपटेक लिमिटेड आणि हंगामा डिजिटल मीडिया एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष होते. प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस, बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज लिमिटेड, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, विकाअर हॉटेल्स लिमिटेड आदी कंपन्याच्या संचालक मंडळावर ते होते.
राकेश झुनझुनवाला यांचे 14 ऑगस्ट रोजी निधन झालं होतं. राकेश झुनझुनवाला 5.8 अब्ज डॉलर्सची संपत्ती मागे सोडून गेले. राकेश झुनझुनवाला हे देशातील 48 व्या क्रमाकाचे श्रीमंत व्यक्ती होते.