Vaccine on Cancer : गर्भाशयाशी संबंधित कर्करोगावर प्रभावी असलेली सर्व्हावॅक (CERVAVAC) लसीची उपलब्धता या वर्षी मर्यादित स्वरुपात असेल, मात्र पुढच्या वर्षी त्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात येईल असं सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पुनावाला यांनी म्हटलं. सीरमकडून गर्भाशयाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी भारतात पहिल्यांदाच ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) सर्व्हावॅक (CERVAVAC) ही लस बाजारात आणण्यात आली आहे.
या वर्षी या लसीची उत्पादन क्षमता खूपच कमी आहे, परंतु पुढच्या वर्षामध्ये यामध्ये वाढ करण्याठी आम्ही प्रयत्नशील आहे असं सीरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदार पुनावाला यांनी म्हटलं. या लसीची किंमत काय असेल या प्रश्नावर मात्र अदार पुणावाला किंवा केंद्र सरकराकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. मी आता किंमतीवर भाष्य करू शकत नाही, आम्ही निविदा प्रक्रियेची प्रतीक्षा करू आणि सरकारी प्रोटोकॉलचे पालन करू असं अदार पुनावाला म्हणाले.
मंगळवारी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने गर्भाशयाच्या कर्करोगासाठी भारतात तयार केलेली पहिली HPV लस लाँच केली.
काय आहे सर्व्हिकल कॅन्सर?
सर्व्हिकल कॅन्सर (Cervical cancer) हा कर्करोगाचा एक प्रकार असून तो गर्भाशयाच्या ग्रीवाच्या पेशींमध्ये होतो. हा कॅन्सर म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) म्हणजे लैंगिक संक्रमित संसर्ग आहे. हा विषाणू गर्भाशयाच्या कर्करोगासाठी कारणीभूत ठरतो.
लस गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रभावी
भारतात गर्भाशयाच्या कर्करोगाचे (Cervical Cancer) प्रमाण वाढले आहे. एका अहवालानुसार, 15 ते 44 वयोगटातील महिलांमध्ये हा दुसरा सर्वात सामान्य कर्करोग आहे. गर्भाशयाचा कर्करोग रोखण्यासाठी लसीकरण मोठ्या प्रमाणात उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेत या लसीचा समावेश केल्यास महिलांमधील गर्भाशयाच्या कर्करोगाची समस्या कमी करण्याच्या दिशेनं एक ठोस पाऊल ठरू शकतं.
ही बातमी वाचा: