President Droupadi Murmu Speech: आपण सर्व एक आहोत, आणि आपण सर्व भारतीय आहोत. देशात अनेक पंथ आणि अनेक भाषा आहेत, पण त्यामुळे आपण विभागलो गेलो नाही तर उलट अजून जवळ आलो. त्यामुळेच आपण लोकशाही प्रजासत्ताक म्हणून यशस्वी झालो आहोत. हे भारताच्या यशाचं सार आहे असं भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी (President  Draupadi Murmu) म्हटलं. देशाच्या 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू या राष्ट्राला संबोधित करत होत्या. 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या की, भारताची वाटचाल एक गरीब आणि अशिक्षित राष्ट्र अशी झाली आणि आता हा देश जागतिक स्तरावर आत्मविश्वाने वावरतो, विकासाच्या रस्त्यावर चालणारा देश बनला आहे. राज्यघटनेच्या निर्मात्यांच्या सामूहिक बुद्धीच्या मार्गदर्शनाशिवाय ही प्रगती शक्यच नव्हती. गेल्या वर्षी भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला होता. आर्थिक अनिश्चिततेच्या जागतिक पार्श्वभूमीवर हे यश प्राप्त झाले आहे. सक्षम नेतृत्व आणि प्रभावी संघर्षाच्या बळावर आम्ही लवकरच मंदीतून बाहेर आलो आणि आमचा विकासाचा प्रवास पुन्हा सुरू केला.


देशातील नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 21 व्या शतकातील आव्हानांसाठी विद्यार्थ्यांना तयार करते आणि आपल्या सभ्यतेवर आधारित ज्ञानाला समकालीन जीवनाशी जोडतं असं राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू म्हणाल्या. 


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे (Highlights of President Draupadi Murmu Speech)


विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आमच्या कामगिरीचा आपल्या कामगिरीचा अभिमान वाटतोय. अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारत हा आघाडीच्या देशांपैकी एक आहे. महिला सक्षमीकरण आणि स्त्री-पुरुष समानता या आता केवळ घोषणा नाहीत, उद्याचा भारत घडवण्यात स्त्रिया जास्तीत जास्त योगदान देतील यात माझ्या मनात शंका नाही. 


सक्षमीकरणाची ही दृष्टी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसह दुर्बल घटकांसाठी महत्त्वाची ठरते. खरे तर आमचे उद्दिष्ट केवळ त्या लोकांच्या जीवनातील अडथळे दूर करणे हे नाही तर त्या समुदायांकडून काहीतरी शिकणेदेखील आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यापासून समाजाला अधिक एकसंध बनवण्यापर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये आदिवासी समुदायाकडून आपल्याला काहीतरी शिकता येईल.


यावर्षी भारत G-20 देशांच्या गटाचे अध्यक्षपद भूषवत आहे. आपल्या वैश्विक बंधुत्वाच्या आदर्शाच्या अनुषंगाने आम्ही सर्वांसाठी शांतता आणि समृद्धीसाठी उभे आहोत. G-20 चे अध्यक्षपद भारताला एक सकारात्मक जग निर्माण करण्यासाठी योगदान देतं, त्यासाठी अतिशय महत्त्वाची भूमिका देते.


जागतिक तापमान वाढ आणि हवामान बदल ही आपल्यासमोरील महत्त्वाची आव्हानं आहेत आणि त्यावर तातडीच्या उपपाययोजना करणं गरजेचं आहे. जागतिक तापमान वाढत आहे आणि हवामान बदलाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत.


विकास आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्राचीन परंपरांकडे नव्या दृष्टीकोनातून पाहावे लागेल. आपल्या मूलभूत प्राधान्यांचाही आपल्याला पुनर्विचार करावा लागेल. पारंपारिक जीवनमूल्यांचे वैज्ञानिक परिमाण समजून घेतले पाहिजेत. आपल्या मुलांनी या पृथ्वीवर सुखी जीवन जगावं असं वाटत असेल तर आपली जीवनशैली बदलण्याची गरज आहे.


यंदाचं 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष म्हणून घोषित करावं अशी सूचना भारताने संयुक्त राष्टांकडे केली होती आणि ती स्वीकारली गेली आहे. अधिकाधिक लोकांनी आपल्या आहारात भरड धान्याचा समावेश केल्यास पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल आणि लोकांचे आरोग्यही सुधारेल.