मुंबई : भारतात दरवर्षी आत्महत्येच्या (Suicides) घटना वाढत आहेत. 2021 मध्ये भारतात (India) तब्बल 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. 2020 मध्ये ही संख्या 1,53,052 होती. 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये आत्महत्यांच्या घटनांमध्ये 7.2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर या वर्षी आत्महत्यांचे प्रमाण  6.2 टक्क्यांनी वाढले आहे. विशेष म्हणजे देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक जास्त म्हणजे 22,207 आत्महत्या झाल्या आहेत.   एनसीआरबीरने (National Crime Records Bureau) नुकताच त्यांचा अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये ही माहिती देण्यात आली आहे. एनसीआरबीरच्या अहवालानुसार देशात रोज 450 लोक वेगवेगळ्या कारणांनी आत्महत्या करत आहेत. 


नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार,  महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडू आणि मध्य प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. अहवालानुसार 2021 मध्ये देशभरात 1,64,033 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत. यामध्ये 22,207 आत्महत्या या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. तर तामिळनाडूत 18,925 लोकांनी आत्महत्या केल्या आहेत.  


नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक 22,207 आत्महत्या झाल्या आहेत. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये 18,925 आत्महत्या, मध्य प्रदेश 14,965, पश्चिम बंगाल 13,500 आणि कर्नाटकात 13,056 आत्महत्या झाल्या आहेत.  


पाच राज्यांमध्ये पन्नास टक्क्यांहून अधिक आत्महत्या  


एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की,  देशभरातील एकूण आत्महत्यांपैकी 50.4 टक्के आत्महत्या या पाच राज्यांमध्ये झाल्या आहेत. उर्वरित 49.6 टक्के आत्महत्या या इतर 23 राज्ये आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाल्या आहेत. देशातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये आत्महत्यांच्या घटनांची संख्या तुलनेने कमी नोंदवली गेली आहे. यूपीमध्ये देशातील आत्महत्या प्रकरणांपैकी केवळ 3.6 टक्के आहे.  


केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्ली अव्वल  


2021 मध्ये केंद्रशासित प्रदेशांमध्ये दिल्लीत सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. दिल्लीत 2840 जणांनी आत्महत्या केल्या आहेत. दिल्लीपाठोपाठ  पुद्दुचेरीमध्ये 504 प्रकरणे आहेत. एनसीआरबीने आपल्या अहवालात म्हटले आहे की 2021 मध्ये देशातील 53 मोठ्या शहरांमध्ये एकूण 25,891 आत्महत्या झाल्या आहेत.


2021 मध्ये संपूर्ण भारतात आत्महत्येचे प्रमाण 12 टक्के होते. अंदमान आणि निकोबार बेटांवर सर्वाधिक आत्महत्या (39.7) झाल्याची नोंद आहे. त्यापाठोपाठ सिक्कीम (39.2), पुडुचेरी (31.8), तेलंगणा (26.9) आणि केरळ (26.9) यांचा क्रमांक लागतो.


आत्महत्येची कारणे
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अलीकडील अहवालानुसार, व्यावसायिक, करिअरशी संबंधित समस्या, एकटेपणा, गैरवर्तन, हिंसा, कौटुंबिक समस्या, मानसिक आजार, दारूचे व्यसन आणि आर्थिक नुकसान या कारणातून आत्महत्या होत असल्याचे समोर आले आहे.