भारतीय लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी स्पष्ट केलंय, की युद्ध झालं आणि सरकारची संमती मिळाली तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू. त्यामुळे अणूबॉम्बच्या धमक्या देणं पाकिस्तानने बंद करावं.
12 जानेवारीला बिपिन रावत यांनी ही भूमिका मांडली आणि पाकिस्तानला मिरच्या झोंबल्या. त्यामुळे पाकिस्तानचे विदेश मंत्री ख्वाजा आसिफ यांनीही त्यावर स्पष्टीकरण दिलं.
''भारतीय सेना प्रमुखांकडून आलेलं विधान जबाबदारीने केलेलं नाही. जर भारत आमच्याकडून अणूबॉम्ब युद्धाची भाषा करत असेल तर आम्हालाही आमची ताकद दाखवून देण्याची संधी आहे. त्यामुळे जनरल बिपिन रावत यांच्या मनातली शंका दूर होईल'', असं ख्वाजा असिफ यांनी म्हटलं आहे.
पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी आपल्याच मंत्र्यांच्या सुरात सूर मिसळला आहे. ''भारताच्या सेना प्रमुखांनी दिलेली धमकी ही भारताच्या नव्या विचारांना स्पष्ट करते. कोणत्याही गैरसमजात राहू नका. कारण, पाकिस्तान आपल्या शस्त्रास्त्रांनीशी पूर्णपणे सज्ज आहे'', असं पाकच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे.
कुणाची ताकद किती?
पाकिस्तानने मोठ-मोठ्या बाता मारण्याच्या आधी एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी, की ग्लोबल फायरच्या अहवालानुसार भारत हा जगातला सगळ्यात शक्तिशाली असा चौथा देश आहे, तर पाकिस्तानचा क्रमांक यामध्ये 13 वा आहे.
- भारताकडे सुमारे साडे 13 लाख सैनिकांची फौज आहे, तर पाकिस्तानकडे 6 लाखांची
- भारताकडे सुमारे 4426 रनगाडे आहेत, तर पाकिस्तानकडे 2924
- भारताकडे असणाऱ्या लढाऊ विमानांची संख्या 2100 च्या घरात आहे, तर पाकिस्तानकडे 950
- भारताकडे 3 विमानवाहक युद्धनौका आहेत, तर पाकिस्तानकडे एकही नाही.
- भारताकडे 15 पाणबुड्या आहेत, तर पाकिस्तानकडे 8
- भारताकडे 110 ते 120 अणुबॉम्ब आहेत, तर पाकिस्तानकडे 120 ते 130
म्हणजेच भूमी, जल आणि वायू या तिन्ही पातळ्यांवरच्या युद्धासाठी भारत हा पाकिस्तानपेक्षा 100 टक्के उजवा आहे आणि त्यामुळे जर युद्ध झालं तर 1965, 71 आणि 99 सारख्या युद्धाची परिस्थिती पाकिस्तानला सहन करावी लागू शकते.
त्यामुळे लष्कर प्रमुख बिपिन रावतांच्या भूमिकेला पाकिस्तानने अजिबात सल्ला वगैरे न समजता आव्हान समजणं गरजेचं आहे. अन्यथा भारत आपल्या शत्रूशी दोन हात करण्यासाठी भक्कमपणे उभा राहिल.