नवी दिल्ली : इस्रायलचे पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू हे आजपासून सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दिल्ली विमानतळावर आज दुपारच्या सुमारास नेत्यानाहू यांचं आगमन झालं. विशेष म्हणजे, नेतन्याहू यांच्या स्वागतासाठी खुद्द पंतप्रधान मोदी हे विमानतळावर उपस्थित होते.


भारताच्या दौऱ्यावर आलेले नेत्यानाहू हे इस्रायलचे दुसरे पंतप्रधान आहेत. पंधरा वर्षांनंतर इस्रायलचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. आणि नेतन्याहू यांचा हा पहिलाच भारतदौरा आहे.

त्यांच्या या दौऱ्यात शेती, सायबर, संरक्षण यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर दोन्ही देशांमध्ये करार होण्याची शक्यता आहे. तसेच, मुंबईवर झालेल्या 26/11 हल्ल्यात आई-वडील गमावलेला 10 वर्षांचा मोशेसुद्धा इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांच्यासोबत आलेला आहे.

दरम्यान, इस्त्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंच्या स्वागताचा धागा पकडत काँग्रेसनं पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली आहे. काँग्रेसनं आपल्या अधिकृत वेबसाईटवर एक व्हिडीओ जारी केला आहे.


यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विविध राष्ट्रांच्या प्रमुखांची गळाभेट असणारे फोटो दाखवण्यात आले असून, त्यात मोदी नेत्यानाहू यांची अजून गळाभेट घेतील. ही त्यांची हग डिल्पोमसी असल्याचं लिहिलं आहे.

दुसरीकडे काँग्रेसच्या टीकेचा भाजपने चांगलाच समाचार घेतला आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसच्या मानसिकतेवर हल्लाबोल करताना, पंतप्रधानांची खिल्ली उडवणं म्हणजे संपूर्ण देशातल्या जनतेची आणि देशाच्या परराष्ट्र धोरणांची खिल्ली उडवल्या सारखं असल्याचं म्हटलं आहे.

तसेच, या प्रकरणावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी भारतीय जनतेची माफी मागितली पाहिजे, अशीही मागणी केली आहे.