नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP)चे सर्वेसर्वा शरद पवार हे दिल्लीमध्ये आहेत. काल (सोमवारी) त्यांनी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली. आज शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली विरोधी पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती मंत्री नवाब मलिकांनी दिली आहे. या बैठकीला 15 ते 20 विरोधी पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक आज (मंगळवारी) दिल्लीत होणार आहे, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीला सर्व निमंत्रित सदस्य आणि परमनंट सदस्य सहभागी होणार आहेत. या बैठकीत विविध अजेंड्यावर चर्चा होणार असल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले.
दरम्यान, या बैठकीनंतर शरद पवारांच्या अध्यक्षतेखाली इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, आरजेडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत असेही नवाब मलिक म्हणाले. नवाब मलिक म्हणाले की, आगामी लोकसभेच्या अधिवेशनाबाबत यामध्ये चर्चा होणार आहे. शिवाय देशातील राजकीय परिस्थितीवरही चर्चा केली जाणार आहे. संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम आजपासून शरद पवार हे करणार असल्याचेही नवाब मलिक म्हणाले.
राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी मुंबईत पवार यांची भेट घेतली होती आणि काल (सोमवारी) दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली असून या भेटीत त्यांनी देशात राजकीय परिस्थिती काय आहे, याची माहिती त्यांच्याकडे जी उपलब्ध होती ती दिल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. आज मोजक्या पक्षांसोबत चर्चा होणार असून त्यानंतर हळूहळू इतर पक्षांना कसं एकत्र आणता येईल त्याबाबतीत हे नेते बसून ठरवणार आहेत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
आज सकाळी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे आणि संध्याकाळी चार वाजता विरोधी पक्षनेते पवारांच्या घरी एकत्र येतील. 2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्ष बाकी आहेत. पण पश्चिम बंगालमध्ये ममतांनी ज्या पद्धतीने भाजपला टक्कर दिली त्यानंतर भाजपला सक्षम पर्याय देण्यासाठी काँग्रेस वगळता इतरांनी एकत्र येण्याची गरज आहे का? याबाबत या हालचाली सुरु आहेत. आजच्या बैठकीसाठी काँग्रेसचा कुणी प्रतिनिधी उपस्थित असेल हे अद्याप तरी स्पष्ट झालेलं नाही.
ज्या राष्ट्र मंचाच्या बॅनरखाली ही मिटिंग होत आहे तो नेमका काय आहे?
2018 मध्ये भाजपशी बिनसल्यानंतर माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी हा मंच स्थापन केला होता. अनेक विरोधी पक्षांचे नेते या मंचात सामील झाले होते. समाजवादी पक्षाचे घनश्याम तिवारी आम आदमी पक्षाचे संजय सिंह, राष्ट्रीय लोकदलाचे जयंत चौधरी, जेडीयूचे माजी खासदार पवन वर्मा, राष्ट्रवादीचे माजिद मेमन हे या राष्ट्रीय मंचचे सदस्य आहेत. काँग्रेसचे मनीष तिवारी, शत्रुघ्न सिन्हा हे दोन नेते देखील मंचाचे सदस्य आहेत. आज दोघेही वेगवेगळ्या कारणांमुळे अनुपस्थित असणार आहे. शरद पवार या मंचाचे सदस्य नाहीत, पण तरीही बैठक त्यांच्या निवासस्थानी होत आहे. राष्ट्रवादीचे माजिद मेमन हे या मंचाचे संस्थापक सदस्यांपैकी एक आहेत. या मंचाच्या सदस्यांना भेटण्याची इच्छा पवारांनी एकदा व्यक्त केली होती. त्यानुसार ही बैठक होत असल्याचं सांगितलं जात आहे.
प्रशांत किशोर यांचा आजच्या राष्ट्रीय मंचाच्या बैठकीशी कुठलाही संबंध नसल्याचं यशवंत सिन्हा म्हणत आहेत. बिगर भाजप, बिगर काँग्रेस आघाडी स्थापन करण्यासंदर्भातला आजच्या बैठकीचा अजेंडा नाही. असंही त्यांचं म्हणणं आहे. सध्याच्या राजकीय स्थितीवर आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. बैठकीसाठी जे आमंत्रण पाठवले आहे ते मंचाचे सदस्य या नात्याने आहे, अधिकृतपणे कुठल्याच पक्षाकडे आमंत्रण पाठवलेले नाही. या राष्ट्रीय मंचाचे एक सदस्य दिनेश त्रिवेदी हे नुकतेच तृणमूल मधून भाजपमध्ये गेलेले आहेत.
यांची असणार उपस्थिती :
शरद पवारांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील महत्वाच्या नेत्यांसह माजी निवडणूक आयुक्त, विचारवंत देखील असणार आहेत.
1) यशवंत सिंन्हा
2) पवन वर्मा
3) संजय सिंग
4) डी.राजा
5) फारुख अब्दुला
6) जस्टीस ए. पी.शाह
7) जावेद अख्तर
8) के सी तुलसी
9) करन थापर
10) आशुतोष
11)माजीद मेमन
12) वंदना चव्हाण
13) एस वाय कुरेशी (Former CEC)
14) के सी सिंग
15) संजय झा
16) सुधींद्र कुलकर्णी
17) अरुण कुमार, Economist
18) कोलिन गोंन्सालविस
19) घनश्याम तिवारी
20) प्रीतिश नंदी
पवार प्रशांत किशोर यांच्यात कुठली खलबतं शिजतायत?
2024 च्या निवडणुकीला अजून तीन वर्षे आहेत पण राष्ट्रीय राजकारणात विरोधी पक्षनेत्यांची एक जूट बांधण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार. शरद पवार आणि प्रशांत किशोर अवघ्या दहा दिवसांच्या आत दोघे दुसऱ्यांदा भेटले. 11 जूनला मुंबईत आणि आज दिल्लीत. पाठोपाठ उद्या राष्ट्रीय राजकारणातले 15 विरोधी पक्ष नेते पवारांच्या घरी एकवटत आहेत.. यशवंत सिन्हा यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय मंचाच्या बॅनरखाली हे सगळे विरोधी पक्ष एक येत आहेत.
मार्च महिन्यात संसदेचं अधिवेशन संपल्यानंतर पवार तीन महिन्यांच्या कालावधीनंतर दिल्लीत आले.. मधल्या काळात त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळे त्यांचे सार्वजनिक जीवनातले कार्यक्रम मंदावले होते.. पण आज दिल्लीत आल्यानंतर ते पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत.. एकीकडे काँग्रेसला अजून पूर्णवेळ अध्यक्ष नाही... सोनिया गांधींची प्रकृती ठीक नसल्याने यूपीएच्या भवितव्याबद्दल शंका व्यक्त होतात... त्यात पवारांची ही खेळी काँग्रेसला वगळून देशात तिसरी आघाडी निर्माण करणार का हे पाहावे लागेल.