नवी दिल्ली: देशात आज एका दिवसात विक्रमी लसीकरण (record breaking covid vaccination for India) झालं आहे. एका दिवसात 80 लाखांहून अधिक लोकांना कोरोना लसीचा(India Vaccination) डोस आज दिला आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आनंद व्यक्त केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, आज लसीकरणाचा विक्रमी आकडा उत्साह वाढवणारा आहे. कोविड-19 च्या विरुद्धच्या लढाईत लस हे आपलं प्रमुख शस्त्र आहे. शाब्बाश इंडिया असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं आहे.  


18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण
देशभरात 21 जून म्हणजेच, आजपासून केंद्र सरकार प्रत्येक राज्यात 18 वर्षांहून अधिक वयाच्या सर्व नागरिकांचं मोफत लसीकरण सुरु करण्यात आलं आहे. कोरोना लसींचं उत्पादन करणाऱ्या उत्पादकांकडून एकूण लसीच्या 75 टक्के भाग भारत सरकार स्वतः खरेदी करुन राज्य सरकारांना मोफत देणार आहे. तसेच भारतात तयार होणाऱ्या लसींपैकी 25 टक्के लसीचे डोस खाजगी रुग्णालयं थेट विकत घेऊ शकणार आहेत. तशी परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे.  खाजगी रुग्णालयं कोरोना लसीच्या निर्धारित किमतीहून एका डोसवर अधिकाधिक 150 रुपये सर्विस चार्ज आकारू शकणार आहेत. यावर लक्ष ठेवण्याचं काम राज्य सरकार करणार आहे. केंद्र सरकार राज्यांची लोकसंख्या, संसर्ग झालेल्यांची संख्या आणि लसीकरणाचा वेग या सर्व बाबींचा सारासार विचार करुन लसींचे डोस पुरवणार आहे. 


महाराष्ट्रात उद्यापासून 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात 


महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं की,  कालपर्यंत महाराष्ट्रात 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींच लसीकरण करत होतो. लसीकरणाच्या कार्यक्रमाला वेग द्यायचा आहे आणि त्यामुळे अठरा पासून पुढच्या सर्व वयोगटातील वर्गाला आपण लसीकरणाला मान्यता आजपासून देत आहोत. त्यामुळे महाराष्ट्राच्या तरुणाईला मला यानिमित्ताने सांगावसं वाटतं की आपण आपापल्या जिल्ह्यातील लसीकरण केंद्रावर जाऊन अठरा वर्षाच्या पुढील युवक-युवती पासून पुढील सर्व वयोगटातील लोकांना लसीकरण करणं शक्य आहे, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.