Nithin Kamath Latest News: व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्राम प्लॅटफॉर्मवरुन तुम्हाला घरबसल्या पैसे कमवण्याच्या संधीचे मेसेज येतात का? तुम्ही आमचे व्हिडीओ लाईक करा आणि पैसे कमवा असे मेसेज येतात का? किंवा पार्ट टाईम जॉब देतो, उच्च परतावा हवा असेल तर पैसे गुंतवा असे मेसेज येत असतील तर सावधान. हा ऑनलाईन फ्रॉड असून तुम्हाला लाखोंचा गंडा बसू शकतो. झिरोधाचे सीईओ नितीन कामथ यांनी त्यांच्या जवळच्या व्यक्तीची अशाच प्रकारे फसवणूक झाली असल्याचा अनुभव शेअर केला आहे.


भारतातील सर्वात मोठी स्टॉक ब्रोकरेज कंपनी असलेल्या झिरोधाचे (Zerodha) संस्थापक आणि सीईओ (CEO) नितीन कामथ यांच्या जवळच्या व्यक्तीची पार्ट टाईम जॉबच्या नादात आर्थिक फसवणूक झाली आहे. टेलिग्रामवर चालणाऱ्या पार्ट टाईम जॉब स्कॅमबद्दल धक्कादायक बाब त्यांनी समोर आणली आहे आणि त्यापासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. 


नक्की घडलं काय?


व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामवर लोकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अनेक टोळ्या सक्रिय आहेत, जे पार्ट टाईम जॉब देत असल्याचं सांगून लोकांना फसवतात. असाच काहीसा प्रकार नितीन कामथ यांच्याशी संबंधित व्यक्तीसोबत घडला आणि त्याने लाखो रुपये गमावले.


संबंधित व्यक्तीला या पार्ट टाईम जॉबची ऑफर व्हॉट्सअ‍ॅपवरुन आली आणि त्या व्यक्तीनेही त्या ऑफरला प्रतिसाद दिला. या जॉबमध्ये सुरुवातीला त्यांना फिडबॅकचे टास्क देण्यात आले. ज्यात पेरु या देशातील काही रिसॉर्ट्स आणि रेस्टॉरंटच्या लिंक पाठवून त्यावर ऑनलाइन खोटे फिडबॅक नोंदवण्यास सांगितले गेले. हा टास्क पूर्ण झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या खात्यात 30 हजार रुपये जमा करण्यात आले.


 






असे टास्क पूर्ण करणाऱ्यांचा टेलिग्रामवर एक स्वतंत्र ग्रुप बनवण्यात आला. या ग्रुपवर नियमित पूर्ण करायचे असलेल्या टास्कची माहिती देण्यात यायची. त्यानुसार, पुढील टास्क हा मॉक क्रिप्टो प्लॅटफॉर्मवर व्यापार करण्याबाबत होता, ज्यात अनेक नियम आणि अटी घालून दिल्या होत्या. स्वत:च्या पैशांची गुंतवणूक न करता व्यापार करण्याची संधी सुरुवातीला देण्यात आली.


हा बिटकाइन किंवा इथरियमचा प्रकार नव्हता. तर हे आभासी क्रिप्टो टोकन होते, ज्यांच्या किमती फसवणूक करणारे सहजपणे हाताळू शकतात. सुरुवातीला एकही रुपया न गुंतवता या कामाचा भरघोस मोबदला मिळत असल्याचे दाखवले जाते आणि लोकांना पैशाचे आमिष लागत जाते.


नितीन कामथ यांच्या जवळच्या व्यक्तीसोबतही काही तसेच झाले. काही दिवसांनंतर, उच्च परतावा मिळवायचा असेल तर थोडे पैसे गुंतवण्याचे आवाहन टेलिग्राम ग्रुपमध्ये केले गेले. त्या ग्रुपमधील इतर व्यक्तींच्या बोलण्यात येऊन कामथ यांच्या मित्रानेही पैसे ट्रान्सफर केले.


त्या प्लॅटफॉर्मद्वारे कमावलेले 30 हजार रुपयेच त्यांच्या मित्राने ट्रान्सफर केले. त्यानंतर आणखी मोबदला मिळाल्यानंतर लोभापोटी आणि ग्रुपमधील सदस्यांच्या दबावापोटी त्याने मोठी रक्कम हस्तांतरित केली.


जेव्हा त्या व्यक्तीने या कामातून माघार घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ते शक्य झाले नाही. ग्रुपमध्ये आणखी गुंतवणूकदारांची गरज असल्याचे सांगण्यात आले. गुंतवणूकदार नसल्याने मोबदला मिळत नसल्याचे सांगण्यात आले, अशात आणखी रक्कम मिळावी म्हणून त्याने 5 लाख रुपये गुंतवले.


प्लॅटफॉर्मने अजून पैसे मागितले, त्यावेळी त्या व्यक्तीने पैसे नसल्याचे सांगितले. त्या व्यक्तीने आपल्या पत्नीला ही गोष्ट सांगितली आणि ही फसवणूक असल्याचे तिला समजले. मदतीसाठी त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.


त्यावेळी पोलिसांकडून अशाच काही प्रकरणांचा अहवाल देण्यात आला. सुशिक्षित लोक देखील अशा घोटाळ्यांमध्ये फसतात आणि आपले पैसे गमावतात, असे पोलिसांनी सांगितले.


व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामवर अशा प्रकारचे फ्रॉड वाढत आहेत आणि आपल्यातील प्रत्येकजण घोटाळेबाजांचं पुढचं लक्ष्य आहे. त्यामुळे, या गोष्टींबद्दल आपण जागरूकता निर्माण करणे आवश्यक असल्याचं नितीन कामथ यांनी म्हटलं आहे. पटकन भरपूर पैसे कमवण्याचा कोणताही सोपा मार्ग नसल्याचंही यावेळी ते म्हणाले.


हेही वाचा:


Delhi: दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलक कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये राडा; नेमकं कशामुळे झाली बाचाबाची?