Karnataka Election: कर्नाटकच्या राजकीय रणधुमाळीत (Karnataka Election) सध्या जय बजरंग बलीचा नारा जोरात ऐकू येतोय. काय घडलं असं की ज्यामुळे बजरंग बली अचानक राजकीय केंद्रस्थानी आले आहेत.  अगदी दोन दिवसांपासून पंतप्रधान मोदींनीही वक्तव्य  केले आहे.  कर्नाटकची रणधुमाळी आता शिगेला पोहचली आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातलं पीएफआय, बजरंग दलासारख्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संघटनांवर प्रसंगी बंदीचं पाऊल उचलू असं काँग्रेसनं म्हटलं. त्यानंतर याला धार्मिक अँगल देत भाजपनं हा डाव काँग्रेसवर उलटवण्याचा प्रयत्न चालू केलाय. 


कर्नाटकमध्ये काँग्रेससाठी बरं वातावरण असल्याचं सर्व्हे सांगत आहे. येडीयुरप्पा आता मैदानात नाहीत, मुख्यमंत्री बोम्मई यांची लोकप्रियता नाही. अशा वातावरणात काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात हा मुद्दा आणला आणि त्यावरुन भाजपला  धार्मिक अँगल देण्याची संधी मिळाली. 


 कर्नाटकच्या वादात बजरंग बलीवरुन वाद का सुरु आहे?


पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय, बजरंग दलासारख्या ज्या धार्मिक संघटना समाजात तेढ निर्माण करतात, त्यांच्यावर बंदी घातली जाईल असं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आहे.  कर्नाटकच्या हम्पीजवळ असलेल्या अंजनाद्री पर्वतरांगांमध्ये बजरंग बलीचं जन्मस्थान असल्याची एक आख्यायिका आहे. आणि त्याच भूमीत बजरंग बली राजकीयदृष्ट्या चर्चेत आलेत. 1984 मध्ये श्रीराम जन्मभूमी आंदोलनादरम्यान बजरंग दलाची स्थापना झाली होती. विनय कटियार यांना बजरंग दलाचं संस्थापक मानलं जातं. बजरंग दल ही आक्रमक हिंदुत्ववादी संघटना आहे. अनेकदा व्हॅलेन्टाईन डे ला प्रेमी जोडप्यांना मारहाण, गो तस्करीच्या आरोपांवरुन मारहाण अशा वादात या संघटनेचं नाव येत राहते. कर्नाटकात लव जिहाद, हिजाबसारख्या वादांत बजरंग दलाचं नाव होतं.


बजरंग दलाबाबत आपल्या भूमिकेवर काँग्रेस ठाम


काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर झाला, त्याच दिवशी जाहीर सभेत पंतप्रधान मोदींना हा मुद्दा उचलला. श्रीरामानंतर आता काँग्रेस बजरंग बलींनाही कैद करु पाहतेय असं वक्तव्य मोदींनी केलं.  दुसरीकडे बजरंग दलाबाबत आपल्या भूमिकेवर काँग्रेस ठाम आहे. बजरंग बलीच्या भक्तांची तुलना केवळ या संघटनेशी करण्याची गरज नाही. जो कुणी कर्नाटकच्या शांततेला भंग करण्याचा प्रयत्न करेल त्यावर आम्ही कारवाई करु असं जाहीरनाम्यात म्हटलंय. त्यात मुस्लीम पीएफआय संघटनेचाही समावेश आहे. बजरंग दलाच्या मुद्द्यावर भाजपची आक्रमता उलट आमच्या पथ्यावरच पडेल असा काँग्रेसचा दावा आहे


कर्नाटकमधल्या या बजरंगी बली वादाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटले. पंतप्रधानांनी जाहीरपणे बजरंग बलीचं नाव घेऊन मतदान करण्याचं आवाहन केलं. त्यावर उद्धव ठाकरेंनी सीमाभागातल्या लोकांना जय भवानी, जय शिवाजीचा नारा देऊन मतदानाचं आवाहन केलं.  उत्तरेत जय श्रीरामच्या नाऱ्यावरुन राजकीय वादळ कसं माजलं हे आपण पाहिलं होतंच. आता दक्षिणेतला आपला एकमेव किल्ला मजबूत ठेवण्यासाठी भाजपला बजरंग बलींची मदत होते का याचं उत्तर 13 मे रोजी कळेल.