Hearing On Wrestlers Case:  महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण प्रकरणी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेली याचिका आज निकाली काढण्यात आली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Chandrachud) यांच्या खंडपीठासमोर आज पुन्हा सुनावणी झाली. त्यावेळी, तक्रारदारांना सुरक्षा देण्यात आली असून या प्रकरणी गुन्हादेखील झाला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण या ठिकाणी अधिककाळ चालवता कामा नये असे खंडपीठाने म्हटले. या प्रकरणाशी निगडीत काही बाबी असतील कनिष्ठ न्यायालय अथवा हायकोर्टात जाण्याची सूचना खंडपीठाने केली. 


लैंगिक शोषण प्रकरणी सुप्रीम कोर्टात तीन कुस्तीपटूंनी याचिका दाखल केली होती. त्यांनी म्हटले, भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात या कुस्तीपटूंनी दिल्ली पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली होती. लैंगिक शोषणासारखा गंभीर आरोप असतानादेखील दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. त्यानंतर कोर्टाने दिल्ली पोलिसांना 26 एप्रिल रोजी नोटीस जारी केली होती. तर, 28 एप्रिल रोजी सु्प्रीम कोर्टात दिल्ली पोलिसांनी एफआयआर नोंदवला असल्याचे सांगितले. 






कुस्तीपटूंच्यावतीने सिब्बल यांनी मांडली बाजू 


वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी खेळाडूंची बाजू मांडत एका अल्पवयीनासह सातही तक्रारकर्त्यांना संरक्षण देण्याची मागणी केली होती. आज दिल्ली पोलिसांच्या वतीने सॉलिसिटर जनरल यांनी सांगितले की, पोलिस साध्या वेशातील अल्पवयीन  कुस्तीपटूला सुरक्षा पुरवत आहेत, जेणेकरून त्याची ओळख उघड होऊ नये. उर्वरित 6 खेळाडूंना कोणताही धोका आढळला नाही. मात्र, त्यांनाही सुरक्षा देण्यात आली आहे.


याचिकाकर्त्यांचे आणखी एक वकील नरेंद्र हुड्डा यांनी आज याचिकाकर्त्यांतर्फे हजर राहत सांगितले की, जंतरमंतर येथे बुधवारी, 3 मे रोजी रात्री उशिरा कुस्तीपटूंना झालेल्या धक्काबुक्कीच्या घटनेचा उल्लेख करत सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण केले. त्यावर सॉलिसीटर जनरल यांनी सांगितले की, हे प्रकरण दिसते तसे नाही. एका राजकीय पक्षाचे दोन नेते परवानगीशिवाय बेड फोल्ड करून तेथे पोहोचले. त्यांना थांबवले असता त्यांनी पोलिसांना विरोध केला. पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्य प्राशन केल्याचेही सांगण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीत हा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले आहे.


महिला आयपीएस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू 


सॉलिसीटर जनरल यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास महिला आयपीएस अधिकारी करत आहे. पोलिसांनी काय करावे आणि कशा प्रकारे करावं, याची सूचना कुस्तीपटू अथवा इतर कोणीही करू शकत नाही. एफआयआर दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आतापर्यंत अल्पवयीन कुस्तीपटूसह पाच जणांचे जबाब नोंदवले आहेत. लवकरच सीआरपीसी कलम 164 अंतर्गत मॅजिस्ट्रेट समोर जबाब नोंदवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.