Corona News : दिल्लीतील एका रूग्णालयातून कोरोनावर ( Corona) मात करून एक महिन्याचे बाळ घरी परतले आहे. या बाळाला कोरोनामुक्त झाल्यानंतर डिस्चार्ज देताना डॉक्टरांसह रूग्णालयातील कर्मचारी भावनिक झाले.
गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोना रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यातच दिल्लीतील एका लहान बालकांच्या रूग्णालयात मागच्या आठवड्यात केवळ एक महिन्याचे बाळ दाखल झाले होते. हे बाळ सतत चिडचिडेपणा करत होतं आणि तापही आला होता. या बाळाच्या आई-वडिलांची कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
दिल्लीतील मुलचंद रूग्णालयातील बाल रोग विभागाच्या सल्लागार डॉ. प्रीती चड्डा यांनी सांगितले की, हे एक महिन्याचे बाळ मागच्या आठवड्यात रूग्णालयात दाखल झाले. त्यावेळी ते खूप रडत होते. त्यामुळे आम्ही त्याचा ताप मोजला त्यावेळी ताप कमी होता. सोमवारी परत एकदा त्याचा ताप तपासण्यात आला. कारण बाळाला दूधही पिता येत नव्हते. त्याच्यावर उपचार सुरूच होते. त्यामुळे दुसऱ्यांदा कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आम्ही तत्काळ त्याला एनएसयूआईमध्ये भरती केले. पुढील 48 तासांत त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
रोज दोन-तीन मुलांना कोरोनाची लागण
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 15 दिवसांमध्ये दिल्लीत रोज कोरोनाची लक्षणे असलेली दोन ते तीन मुले रूग्णालयात दाखल होत आहेत. यातील काही बालकांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत असल्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार करण्याचा सल्ला आम्ही देत आहोत. दरम्यान, दिल्लीत कोरोनाचे रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. शुक्रवारी 24 हजार पेक्षा जास्त कोरोना रूग्णांची दिल्लीत नोंद झाली आहे.
महत्वाच्या बातम्या