On this day in history February 28 : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. प्रत्येक वर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस 'राष्ट्रीय विज्ञान दिवस ' म्हणून भारतात साजरा केला जातो. त्याशिवाय आज भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांची पुण्यातिथी आहे. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.



राष्ट्रीय विज्ञान दिवस  National Science Day


देशभरात 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकशास्त्रज्ञ, सर चंद्रशेखर वेंकट रामन यांनी रामन परिणामाचा (Raman Effect)शोध लावला. यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात. भारतीयांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण रुजला जावा हे याचं उद्दिष्ट आहे.


राजेंद्र प्रसाद यांची पुण्यतिथी -


स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांचं आजच्याच दिवशी 1963 मध्ये निधन झालं होतं. 26 जानेवारी 1950 ते 13 मे 1962 या कालावधीत राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपद भूषवलं आहे.  डॉ. राजेंद्र प्रसाद एक प्रामाणिक, निष्ठावंत आणि उच्च विचारांचे व्यक्ती होते, त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या सेवेसाठी वाहिले. साधे राहणीमान आणि उच्च विचारांच्या धोरणावर प्रसाद यांना विश्वास होता. 1884 मध्ये बिहारच्या सीवान जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला होता. राजेंद्र प्रसाद यांनी गुलाम भारताला इंग्रजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठीच्या लढ्यात मोलाचे योगदान दिले होते.


करसन घावरी यांचा जन्म 


कसोटी क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारे पहिले वेगंदाज करसन घावरी यांचा आजच्याच दिवशी 1951 मध्ये जन्म झाला होता.  गुजरातमधील राजकोटमध्ये त्यांचा जन्म झाला होता. करसन घावरी यांचं क्रिकेट करिअर जास्त दिवस चालले नाही. पण त्यांनी आपल्या छोट्या करिअरमध्ये अनेक विक्रम केले. घावरी यांनी कपिल देवसोबत भारतीय संघात वेगवान गोलंदाजीची धुराही सांभाळली. 1975 मध्ये त्यांनी पहिला कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात त्यांना फक्त दोन विकेट मिळाल्या होत्या. घावरी यांनी आपल्या बॉऊंसरने प्रतिस्पर्धी फलंदाजांचे कंबरडे मोडले. 


वर्षा उसगांवकरचा जन्म 


वर्षा उसगांवकर या मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. 90 च्या दशकातील वर्षा उसगांवकर यांच्या चित्रपटांमध्ये प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. गंमत-जंमत, आमच्या सारखे आम्हीच, हमाल दे धमाल, एक होता विदुषक यांसारख्या हिट मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. तसेच चित्रपटांबरोबरच सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधून देखील त्या प्रेक्षकांच्या भेटीस आल्या.
 
जॉन सायमन यांचा जन्म


सर  जॉन सायमन यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1873 रोजी युकेतील मँचेस्टर येथे झाला होता. सायमन कमिशन या आयोगाचे ते अध्यक्ष होते. सायमन कमिशन हे 1928 साली ब्रिटिश भारताच्या वसाहतींत घटनात्मक सुधारणा राबवण्याच्या दृष्टीने पूर्वाभ्यास करायला पाठवलेला सात ब्रिटिश संसद सदस्यांचा आयोग होता. या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन होते. या आयोगाच्या भारतातील आगमनापासून लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते.


1897 : डॉ. शंकर दामोदर पेंडसे जंयती 


मराठी ग्रंथकार आणि संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म आजच्याच दिवशी 1897 मध्ये झाला होता. पंढरपूर येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे (१९५५) ते अध्यक्ष होते. 23 ऑगस्ट 1947 रोजी त्यांचं निधन झालं होतं. 


1901: लिनस कार्ल पॉलिंग 


रसायनशास्त्रज्ञ आणि अण्वस्त्रांच्या विरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते लिनस कार्ल पॉलिंग  यांचा जन्म 28 फेब्रुवारी 1901 मध्ये झाला होता. रसायनशास्त्रात आणि अण्वस्त्रांच्या विरोधात त्यांनी केलेल्या कार्यबद्दल त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आले. नोबेल पारितोषिकाचे ते दोनदा विजेते ठरले आहेत. 1954 मध्ये रसायनशास्त्र तर 1962 मध्ये शांततेचा नोबल पुरस्कार मिळाला होता. 19 ऑगस्ट 1994 रोजी त्यांचं निधन झालं.   


1926 : कवी गोविंद यांची पुण्यातिथी


स्वातंत्र्य शाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद  यांचे आजच्याच दिवशी 1926 मध्ये निधन झालं होतं. लहानपणीच तापामुळे कमरेखालील सर्व अंग लुळे पडून त्यांना कायमचे अपंगत्व आले होते. त्यामुळे त्यांचे शिक्षणही होऊ शकले नाही.  मात्र ते बालपणापासून कविता करत होते.  स्वातंत्रवीर सावरकरांशी त्यांचे निकटचे संबंध आल्यानंतर त्यांच्या कवितेला उत्कट राष्ट्रभक्तीची आणि तीव्र स्वातंत्र्याकांक्षेची दिशा गवसली होती. 


1998 : राजा गोसावी यांचं निधन -


राजाराम शंकर गोसावी म्हणजे राजा गोसावी यांचं निधन 28 फेब्रुवारी 1998 रोजी झालं होतं. राजा गोसावींना विनोदाचा राजा म्हणून तेव्हा ओळखलं जात होतं.  प्रफुल्ल पिक्चर्समध्ये त्यांनी आधी ऑफिस बॉयचे,  नंतर सुतारकाम केले पुढे मेक-अप, प्रकाश योजना आदी खात्यांत काम करत ते ’एक्स्ट्रा’ नट बनले. राजा गोसावी यांनी अनेक चित्रपटात अभिनय केला. अखेर जमलं, अवघाची संसार, आंधळा मागतो एक डोळा, आलिया भोगासी, उतावळा नवरा, पैशाचा पाऊस, बाप माझा ब्रह्मचारी यासारख्या चित्रपटात त्यांनी काम केलेय.