National Science Day 2023 : आज 'राष्ट्रीय विज्ञान दिन' (National Science Day). 28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रामन (C.V.Raman) यांनी भारतातील 'रामन इफेक्ट'चा शोध लावला. तेव्हापासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. विज्ञानाच्या फायद्यांबद्दल समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि वैज्ञानिक वृत्ती निर्माण करण्यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या' अंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो.


रामन इफेक्टचा शोध लागल्याने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या शोधाची घोषणा भारतीय शास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकटरामन यांनी 28 फेब्रुवारी 1928 रोजी केली होती. या शोधाबद्दल त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले होते.


सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न'ने गौरव


भारतात 1986 पासून दरवर्षी 28 फेब्रुवारी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' म्हणून साजरा केला जातो. भौतिकशास्त्रातील आपल्या संशोधनामध्ये त्यांना रामन इफेक्टचा शोध लावला. याच संशोधनातून पुढे रामन स्कॅटरींगचा शोध लागला. जेव्हा एखादा प्रकाशाचा किरण धूळ कण विरहीत, पारदर्शक रासायनिक संयोगातून जातो त्यावेळी त्यातील प्रकाशाचा काही अंश येणाऱ्या किरणांच्या विरुद्ध दिशेला तयार होतो. हे पसरलेले प्रकाशाचे किरण एकाच तरंगाचे असतात. मात्र, काही प्रकाश किरण हे सोडण्यात आलेल्या प्रकाशाच्या किरणांहून वेगळ्या तरंगाचे असतात यालाच 'रामन इफेक्ट' म्हणतात. या शोधासाठी त्यांना नोबेल व्यतिरिक्त 1954 मध्ये सर्वोच्च भारतीय पुरस्कार 'भारतरत्न'ने गौरवण्यात आलं.


राष्ट्रीय विज्ञान दिनाचं उद्दिष्ट


विज्ञानात रुची वाढवण्यासाठी आणि समाजात विज्ञानाविषयी जागरूकता निर्माण व्हावी यासाठी 'राष्ट्रीय विज्ञान दिन' साजरा केला जातो. 'राष्ट्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद' आणि 'विज्ञान आणि तंत्रज्ञान' मंत्रालयाकडून या दिवशी देशभरात अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे देशातील विज्ञानाची निरंतर प्रगती कायम ठेवणे. यासह, देशात अणुऊर्जेविषयी असलेली लोकांच्या मनातील भीती दूर करणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. केवळ अणुऊर्जेने देशाचा अथक विकास सुनिश्चित केला जाऊ शकतो. समाजातील लोकांचे जीवनमान उंचावेल आणि विकसित होऊ शकेल, हे उदिष्ट असते.


राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बहुतेक शाळा, महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये विज्ञानासंबंधित अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. याशिवाय विज्ञान संस्था, विज्ञान प्रयोगशाळा, विज्ञान अकादमींमध्ये अनेक वैज्ञानिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी भाषण, निबंध, लेखन, विज्ञान प्रश्नोत्तरी, विज्ञान प्रदर्शन, चर्चासत्र आणि चर्चासत्राचे आयोजन देखील केले जाते.