Manish Sisodia CBI Remand : दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सिसोदिया यांना रात्री अटक करण्यात आली होती. राऊज अवेन्यू कोर्टाने (Rouse Avenue Court) ही कोठडी सुनावली आहे.
रविवारी केलेल्या अटकेच्या कारवाईनंतर आज सिसोदिया यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सीबीआयने पाच दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. सिसोदिया यांच्या सांगण्यावरून कमिशन 5 कोटींवरून 12 कोटी रुपये करण्यात आले. चौकशीसाठी रिमांड आवश्यक असल्याचा मुद्दा सीबीआयने कोर्टात मांडला.
सीबीआयने मागितलेल्या मनीष सिसोदिया यांच्या कोठडीला त्यांचे वकील दयान कृष्णा यांनी विरोध केला. रिमांड मागण्याचे कोणतेही कारण नसून तपासात असहकार्याचे आरोप निराधार असल्याचेही त्यांनी कोर्टात नमूद केले. सिसोदिया यांच्या वकिलाने सांगितले की, नायब राज्यपालांच्या मंजुरीनंतर कमिशनमध्ये वाढ करण्यात आली आहे. नायब राज्यपालांना याबाबतची सगळी माहिती होती, असेही त्यांनी म्हटले. मद्य धोरणाच्या निर्णय प्रक्रियेत पारदर्शकता होती, असेही त्यांनी म्हटले.
मनीष सिसोदिया यांचे वकील दयान कृष्णा म्हणाले की, सिसोदिया यांना बजावण्यात आलेल्या प्रत्येक नोटिशीनंतर ते सीबीआयसमोर हजर झाले. कोर्टात सिसोदिया यांच्यावतीने तीन वकील उपस्थित होते. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर राऊस एव्हेन्यू कोर्टाने मनीष सिसोदिया यांच्या सीबीआयच्या कोठडीच्या मागणीवरील निर्णय काही काळासाठी राखून ठेवला होता.
तत्पूर्वी, सीबीआयने दिल्ली उत्पादन शुल्क धोरण प्रकरणासंदर्भात आठ तासांच्या चौकशीनंतर रविवारी उपमुख्यमंत्र्यांना अटक केली होती. सोमवारी दुपारी त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
सीबीआय अधिकारी अटकेच्या कारवाईविरोधात होते: केजरीवालांचा दावा
आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मनीष सिसोदिया यांच्या अटकेचा निषेध केला आहे. केजरीवाल यांनी ट्विट करत म्हटले की, बहुतेक सीबीआय अधिकारी मनीष सिसोदियांच्या अटकेच्या कारवाई विरोधात होते, असे मला काहींनी सांगितले आहे. प्रत्येकाला त्यांच्याबद्दल खूप आदर आहे आणि त्यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत, परंतु त्याला अटक करण्यासाठी राजकीय दबाव इतका मोठा होता की त्यांना हे करावे लागले असल्याचा दावा सिसोदिया यांनी केला.
भाजप-काँग्रेसचा सिसोदिया यांच्यावर निशाणा
दुसरीकडे, भाजपने आप आणि मनीष सिसोदिया यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. आम आदमी पक्ष त्यांना निरागस व्यक्ती असल्याचे दाखवत आहे. तर, दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अनिल चौधरी यांनी मनीष सिसोदिया यांना अटक करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
आणखी तीन जणांना अटक
दिल्ली सरकारने काढलेल्या मद्य परवाना धोरणाच्या प्रकरणात सीबीआयने रविवारी चौथी अटक केली. यापूर्वी विजय नायर, समीर महेंद्रू आणि अभिषेक बोईनापल्ली यांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात एकीकडे केंद्र सरकारच्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आम आदमी पक्षाचा आरोप आहे. दुसरीकडे, आप सरकारच्या अबकारी धोरणातून नेत्यांच्या मित्रांना फायदा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :