8 November In History : द्रविड-तेंडुलकरची विक्रमी 331 धावांची भागिदारी, सहा वर्षांपूर्वी ऐतिहासिक नोटबंदीचा निर्णय; आज इतिहासात
On This Day In History : भाजपचे नेते आणि ज्येष्ठ राजकारणी लालकृष्ण अडवाणी यांचा आज जन्मदिन. लालकृष्ण अडवाणी हे भाजपच्या संस्थापकांपैकी एक नेते आहेत.
![8 November In History : द्रविड-तेंडुलकरची विक्रमी 331 धावांची भागिदारी, सहा वर्षांपूर्वी ऐतिहासिक नोटबंदीचा निर्णय; आज इतिहासात On This Day In History 8 November Rahul Dravid Sachin Tendulkar s record partnership of 331 runs historic demonetisation decision six years ago 8 November In History : द्रविड-तेंडुलकरची विक्रमी 331 धावांची भागिदारी, सहा वर्षांपूर्वी ऐतिहासिक नोटबंदीचा निर्णय; आज इतिहासात](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/07/8636fa0ef210c824eeda748dd9030e06166784550817493_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: देशात आणि जगभरात अनेक अशा घटना घडतात ज्यांती नंतरच्या काळात इतिहासात नोंद घेतली जाते. याच घटनांचा भविष्यातील अनेक धोरणांवर परिणाम होतो. त्यापैकीच एक घटना म्हणजे नोटबंदी. 8 नोव्हेंबर 2016 साली भारतात नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि एका रात्रीतून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. आजच्या दिवशी इतिहासात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या आहेत.
1920- नृत्यांगना सितारा देवी यांचा जन्मदिन
सितारा देवी (Sitara Devi) या प्रसिद्ध भारतीय कथक नर्तिकांचा जन्म 8 नोव्हेंबर 1920 रोजी झाला. त्या सोळा वर्षाच्या असतानाच रवींद्रनाथ टागोर यांनी सितारा देवींच्या नृत्य अभिनयासाठी त्यांना नृत्यसम्राज्ञी अशी पदवी दिली. 13 मे 1970 रोजी सितारादेवींनी मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात सतत अकरा तास पंचेचाळीस मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम केला.
1927- लालकृष्ण अडवाणी यांचा जन्मदिन
भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani) यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1927 रोजी झाला. ते भारतीय जनसंघाचे नेते होते आणि 1974 साली ते राज्यसभेवर निवडून गेले. आणिबाणीच्या कालावधीत त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. 1977 साली जनसंघ जनता पक्षात विलीन झाल्यानंतर ते जनता पक्षात सामील झाले. 1980 साली भारतीय पक्षाची स्थापना झाली आणि लालकृष्ण अडवाणी हे त्याच्या संस्थापकांपैकी एक नेते होते. 1998 साली भाजपची सत्ता आल्यानंतर ते देशाचे गृहमंत्री झाले. तर 2002 ते 2004 या दरम्यान ते देशाचे उपपंतप्रधान बनले. 1986 ते 1990, 1993 ते 1998 आणि 2004 ते 2005 या दरम्यान ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष होते. लालकृष्ण अडवाणी सध्या भाजपच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहेत.
1972- अमेरिकन चॅनेल एचबीओ सुरू
एचबीओ म्हणजे होम बॉक्स ऑफिस (HBO) या प्रसिद्ध अमेरिकन चॅनेलची सुरुवात आजच्याच दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 1972 रोजी झाली. चार्ल्स डोलन यांनी या चॅनेलची सुरुवात केली असून आज एचबीओचे अनेक चॅनेल आहेत.
1999- राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर यांची 331 धावांची विक्रमी भागिदारी
आजचा दिवस, 8 नोव्हेंबर भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक असा आहे. 8 नोव्हेंबर 1999 साली भारत विरुद्ध न्यूझीलंड या एकदिवसीय सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि द वॉल राहुल द्रविड यांनी ऐतिहासिक अशी 331 धावांची भागिदारी रचली होती. हैदराबादमध्ये लाल बहादुर शास्त्री स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात द्रविडने 153 चेंडूत 15 चौकार आणि 2 षटकारांसह 153 धावा केल्या होत्या. तर सचिनने नाबाद राहात 150 चेंडूत नाबाद 186 धावा केल्या. यात त्याच्या 20 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. सचिन आणि द्रविडच्या भागिदारीवर भारताने 376 धावांचा डोंगर उभा केला होता. या सामन्यात भारताने विजय मिळवला होता.
2013- फिलिपाईन्समध्ये हैयान वादळ, 10 हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू
8 नोव्हेंबर 2013 रोजी फिलिपाईन्समध्ये हैयान हे चक्रीवादळ आलं. या चक्रिवादळात जवळपास 10 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. तर लाखो लोक बेरोजगार झाले.
2016- मोदी सरकारने नोटबंदी जाहीर केली
मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे नोटबंदीचा (Demonetisation) निर्णय. 8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री 8 वाजता नोटबंदीचा निर्णय जाहीर करण्यात आला आणि 500 आणि 1,000 रुपये किमतीच्या नोटा चलनातून माघार घेण्यात आल्या. 8 नोव्हेंबर 2016 पर्यंत रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मूल्यांच्या बँक नोटांची कायदेशीर निविदा स्थिती मागे घेतली. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशातील भ्रष्टाचार, काळा पैसा हद्दपार होईल, दहशतवादी कारवायांवर आळा बसेल, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. या निर्णयाला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)