मुंबई: अयोध्येत राम मंदिराच्या निर्माणाला गती मिळत असल्याच्या पार्श्वभूमीवर त्या ठिकाणच्या इतिहासावर एक नजर टाकणे अत्यावश्यक ठरते. याच ठिकाणी असलेल्या बाबरी मशिदीचा विद्ध्वंस 6 डिसेंबर 1992 रोजी करण्यात आला होता. 30 वर्षांपूर्वी घडलेली ही घटना देशाच्या इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाच्या घटनांपैकी एक आहे. त्यानंतर देशामध्ये धार्मिक दंगली उसळल्या आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. 


1732- वॉरन हेस्टिंगचा जन्मदिन 


भारतातील ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंगचा आजच्या दिवशी म्हणजे 6 डिसेंबर 1732 रोजी ब्रिटनमधील ऑक्सफर्डशायर या ठिकाणी झाला. 


1917- फिनलँड स्वातंत्र झाला 


6 डिसेंबर 1917 रोजी युरोपमधील फिनलँडने रशियापासून स्वत:ला स्वतंत्र घोषित केलं. 


1921- आयर्लंडला स्वतंत्र देशाचा दर्जा 


ब्रिटनमधून स्वातंत्र्य होण्यासाठी आयर्लंडने मोठा लढा दिला. त्याच्या या लढ्याला यश आलं आणि 6 डिसेंबर 1921 रोजी ब्रिटिश सरकार आणि आयर्लंड यांच्यामध्ये एक करार करण्यात आला. त्यानुसार आयर्लंडला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आणि ब्रिटिश राष्ट्रकुलाचा एक सदस्य म्हणूनही घोषित करण्यात आलं. 


1946- होमगार्डची स्थापना 


भारतीय पोलीस दलाला साहाय्यकारी असणाऱ्या  होमगार्ड अर्थात गृहरक्षक दलाची स्थापना 6 डिसेंबर 1946 रोजी करण्यात आली. 1946 साली मध्ये मुंबईत मोठ्या प्रमाणात जातीय दंगली भडकल्या होत्या. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री मोरारजी देसाई यांनी होमगार्डची स्थापना केली. याचं पूर्वीचं नाव नगरसेना असं होतं. सुरुवातीला मुंबई आणि नंतर अहमदाबादमध्ये याची स्थापना करण्यात आली. 


1956- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 


भारतीय घटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या, त्यांच्या आंदोलनाला नवी दिशा देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी निधन झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले. निधनापूर्वी बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता. यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात येतो. महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी 1 डिसेंबरपासूनच मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे देशभरातून लक्षावधी लोकांची गर्दी होते. 


1978- स्पेनमधील हुकुमशाहीचा अस्त  


स्पेनमध्ये तब्बल 40 वर्षांची हुकुमशाही आजच्याच दिवशी म्हणजे 6 डिसेंबर रोजी संपली. देशातील हुकुमशाही संपवण्यासाठी स्पेनच्या नागरिकांनी मतदान केलं. त्यामध्ये देशात लोकशाही यावी यासाठी नागरिकांनी कौल दिला. त्यानंतर देशाचे वेगळं संविधान निर्माण करण्यात आलं. 


1992- बाबरी मशिदीचा विध्वंस


देशाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या घटनांपैकी एक असलेल्या बाबरी मशिदीचा विध्वंस (Babri Masjid Demolition) 6 डिसेंबर 1992 रोजी करण्यात आला. श्रीरामाच्या जन्मठिकाणी ही मशीद बांधल्याचा दावा करत कारसेवकांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला. या घटनेनंतर देशाच्या राजकारणाची दिशा बदलली. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर 1993 साली देशात मुंबईत अनेक ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. देशामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. ठिकठिकाणी हिंदू-मुस्लिम दंगली उसळल्याचं चित्र होतं. 


नंतरच्या काळात या घटनेची चौकशी करण्यासाठी लिबरहान आयोगाची नेमणूक करण्यात आली. या आयागाला तब्बल 48 वेळा मुदतवाढ देण्यात आली. आयोगावर आठ कोटींपेक्षा जास्त खर्च झाल्यावर, दीड दशकांनी म्हणजे 2009 साली अहवाल सादर करण्यात आला. या अहवालात भाजपच्या आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या अनेक नेत्यांवर आरोप ठेवण्यात आला. नंतरच्या काळात या सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 


2007- ऑस्ट्रेलियात शिख विद्यार्थ्यांना कृपाण बाळगण्यास परवानगी 


ऑस्ट्रेलियामध्ये शिख विद्यार्थ्यांना कृपाण बाळगण्यास आणि मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यावर बंदी होती. यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. अखेर विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाला यश आलं आलं आणि 6 डिसेंबर 2007 रोजी शिख विद्यार्थ्यांना कृपाण बाळगण्यास आणि मुस्लिम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास परवानगी देण्यात आली.