On This Day In History : इतिहासात 6 फेब्रुवारी हा दिवस अनेक अर्थाने महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी 2022 मध्ये लता मंगेशकर यांचे निधन झाले. आपल्या गायिकेच्या जोरावर लता मंगेशकरांनी बॉलिवूडवर एक वेगळीच छाप उमटवली. त्याशिवाय आजच्याच दिवशी अन्ना चांडी  ((Justice Anna Chandy)) यांच्या रुपाने भारताला पहिल्या महिला न्यायाधीश मिळाल्या होत्या. तर सरहद गांधी म्हणून ओळखले जाणारे खान अब्दुल गफार खान यांचा जन्म झाला होता... त्यांना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलेय. जाणून घेऊया आजच्या दिवशी इतिहासात काय घडलं होतं. 


1890 : खान अब्दुल गफार खान यांचा जन्म ( Khan Abdul Ghaffar Khan)


भारतरत्न खान अब्दुल गफार खान यांचा आजच्याच दिवशी 1890 मध्ये जन्म झाला होता.  महात्मा गांधींसारखी महान व्यक्ती म्हणून त्यांना सरहद गांधी असे गौरवाने संबोधिले जाते.  खान अब्दुल गफार खान हे वायव्य सरहद्द प्रांतातील स्वातंत्र्यसेनानी होते. ज्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये भाग घेतला होता. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय होते.  अब्दुल गफ्फार खान एक राजनैतिक आणि आध्यात्मिक नेता होते, त्यांना महात्मा गांधी सारखे अहिंसा आंदोलनासाठी ओळखले जात होते. ते महात्मा गांधी यांचे समर्थक होते. ब्रिटिश इंडिया मध्ये त्यांना ‘फ्रंटियर गांधी’ या नावाने संबोधले जायचे.  


1911: अमेरिकेचे माजी राष्ट्रपती रोनाल्ड रीगन (Ronald Reagan) यांचा आजच्याच दिवशी 1911 मध्ये जन्म झाला होता. रोनाल्ड विल्सन रीगन  (Ronald Reagan)  खास व्यक्तित्व आणि अनोख्या अंदाजामुळे जगभरात ओळखले जायचे. अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचलेले ते एकमेव चित्रपट अभिनेता होते.  5 जून 2004 रोजी रोनाल्ड रीगन (Ronald Reagan)यांचं निधन झालं.  


1931: मोतीलाल नेहरू यांचं निधन (Motilal Nehru)


भारतीय स्वातंत्र्यसेनानी मोतीलाल नेहरू यांचं आजच्याच दिवशी 1931 मध्ये लखनौ येथे निधन झालं होतं. ते भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचे वडील होते. मोतीलाल नेहरू यांनी अलाहाबादमध्ये एक नामवंत वकील म्हणून काम पाहिलेय. पुढे त्यांनी वकिली सोडून दिली व भारतीय स्वातंत्र्यलढ्यात लक्ष घातले. 1922 साली त्यांनी देशबंधू चित्तरंजन दास व लाला लजपत राय ह्यांच्याबरोबर काँग्रेस पक्षांतर्गत स्वराज पक्षाची स्थापना केली होती.


1932 : 'अयोध्येचा राजा' प्रदर्शित 


सहा फेब्रुवारी हा दिवस भारतीय सिने जगतासाठी महत्त्वपूर्ण आहे. कारण, आजच्याच दिवशी 1932 मध्ये ‘अयोध्येचा राजा’ हा पहिला मराठी बोलपट मुंबईच्या 'कृष्णा' चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता.  व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित या चित्रपटात गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 


1952 : एलिजाबेथ द्वितीय Queen Elizabeth II


सहा फेब्रुवारी 1952 रोजी एलिजाबेथ द्वितीय या ग्रेट ब्रिटनच्या सिंहासनावर विराजमान झाल्या. 2002 मध्ये त्यांनी सिंहासनावर 50 वर्ष पूर्ण केल्याचा सेलिब्रेशन केले होते. 
1952 मध्ये सुरू झालेली त्यांची राजवट 70 वर्षे आणि सात महिन्यांपर्यंत होती.  इतिहासातील कोणत्याही ब्रिटीश सम्राटापेक्षा ही राजवट सर्वात मोठी होती. ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांचं गुरुवारी 8 सप्टेंबर 2022 रोजी निधन झालं होतं. एलिझाबेथ द्वितीय या फक्त ब्रिटनच्या महाराणी नाहीत. ब्रिटीश राष्ट्रकुल परिषदेतील कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन बेट समूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, ॲंटिगा आणि बार्बुडा आणि सेंट किट्स आणि नेव्हिसया या 16 देशांची महाराणी होत्या. 


 1958 : म्यूनिखमध्ये झालेल्या एका विमान दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला होता. या दुर्देवी अपघातामध्ये मँनचेस्टर युनायटेड फुटबॉल क्लबच्या सात खेळाडूंचेही निधन झालं होतं.  


पहिल्या महिला न्यायाधीश -
1959 : अन्ना चांडी (anna chandy) या आजच्याच दिवशी केरळ उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या.  देशातील पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची इतिहासात नोंद झाली.  4 मे 1905 रोजी केरळमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी महिलाच्या न्यायासाठी नेहमीच लढा दिला.  20 जुलै 1996 रोजी त्यांचं निधन झालं होतं. 


1971 : चंद्रावर गोल्फ खेळणारा एकमेव व्यक्ती


अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने अपोलो-11 मिशन अंतर्गत पहिल्यांदा चंद्रावर मानवाला पाठवले होते.  नील आर्मस्ट्राँग हे चद्रांवर पाऊल ठेवणारे पहिले व्यक्ती बनले होते. पण एलन शेपर्ड हे चंद्रावर गोल्फ खेळणारे एकमेव व्यक्ती आहेत. 1971 मध्ये त्यांनी चंद्रावर गोल्फ बॉल हिट केला होता. अपोलो 14 या मिशनअंतर्गत 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 1971 पर्यंत एलन शेफर्ड, एअर मिशेल आणि स्टुअर्ट रूसा हे चंद्रावरावर 2.7 किलोमीटर चालले. तेथे गोल्फ देखील खेळले. एलन शेपर्ड यांनी चंद्रावर गोल्फ गोल्फने बॉल मारला... असे करणारे ते एकमेव व्यक्ती आहेत. 


1993 : अमेरिकेचे टेनिसपटू आर्थर ऐश यांचं एड्स-संबंधित न्यूमोनियामुळे निधन झालं होतं. ग्रँड स्लॅम जिंकणारे ते पहिले कृष्णवर्णीय खेळाडू होते. 


2002 : भारताच्या सीमाभागात घुसलेल्या पाकिस्तानच्या हेर विमानाला पाडण्यात आले.


2008 : भारत सरकारने आसामच्या माजुली बेटाला सांस्कृतिक भूमीच्या श्रेणीमध्ये जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी नामांकन केले होते. माजुली बेटावर दरवर्षी लाखो पर्यटक फिरायला जातात. हे जगातील सर्वात मोठ्या बेटापैकी एक आहे. सुमारे 1200 किमीवर हे बेट पसरलेले आहे.  या बेटाभोवतीची आदिवासी आणि त्यांची संस्कृती पर्यटकांना अधिक आकर्षित करते. लवकरच युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये या बेटाचा समावेश होईल. 


2022 - लता मंगेशकर यांची पुण्यतिथी (Lata Mangeshkar)
गानकोकिळा लता मंगेशकर यांचे आजच्याच दिवशी 2022 मध्ये निधन झाले होतं. संगितक्षेत्रातील त्यांच्या अलौकिक योगदानामुळे त्यांना भारत सरकारनं भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित केले होते.  चित्रपटसृष्टीवर कित्येक वर्षे लता मंगेशकर यांच्याच आवाजाची जादू होती. त्यांच्या गायनाशिवाय चित्रपट संगीतच पूर्ण होऊ शकत नव्हते, असाही एक काळ होता.  आकाशवाणीवर कित्येक दशके असा क्वचितच एखादा दिवस जात असेल ज्या दिवशी लतादीदींचे आवाज रसिकांना रेडिओवर ऐकायला मिळाला नाही. लता मंगेशकरांनी 20 भाषांमधील तीस हजारपेक्षा अधिक गाणी गायली आहेत. लता मंगेशकरांना 2001 साली 'भारतरत्न' या सर्वोच्च सन्मानाने गौरविण्यात आले. त्या आधी त्यांना पद्मभूषण (1969), पद्ममविभूषण (1999), दादासाहेब फाळके पुरस्कार (1989) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं होतं.