Pakistan On Kashmir : पाकिस्तान सध्या दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. महागाई गगनाला भिडली असून लोकांना अन्नासाठी वणवण करावे लागत आहे. परंतु, अशा परिस्थितीत देखील पाकिस्तान आपल्या कुरापती थांबवत नसल्याचं समोर आलं आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी काश्मीरबाबत पाकिस्तानचा मोठा कट उघड केला आहे. या कटा अंतर्गत पाकिस्तान जगभरातील त्यांच्या पाकिस्तानी मिशनसह काश्मीरबाबत खोटी माहिती पसरवण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांच्याकडून एक टूलकिट देखील तयार करण्यात आले आहे.
भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीमुळे काश्मीरबाबत पाकिस्तानचे आणखी एक काळे सत्य समोर आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काश्मीरबाबत सोशल मीडियावर खोटी माहिती पसरवण्याची आणि जगभरातील आपल्या मिशनद्वारे निदर्शने आयोजित करण्याची योजना आखली आहे. खरंतर 5 फेब्रुवारीला काश्मीर एकता दिनाच्या नावाखाली पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बदनामी करण्याचा मोठा डाव आखला होता.
काश्मीरवरील षडयंत्रासाठी टूलकिट
सोशल मीडियावर काश्मीर मुद्द्यावर खोट्या बातम्या आणि प्रचार करण्यासाठी पाकिस्तानने तपशीलवार टूलकिट तयार केल्याचे एका गुप्त नोटमध्ये उघड झाले आहे. इस्लामाबादमध्ये असलेल्या पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने जगभरातील सर्व पाकिस्तानी मिशनला पाठवलेल्या या गुप्त नोटमध्ये काश्मीरवरून भारताविरुद्धचा कट कसा राबवायचा यासाठी टूलकिट तयार केल्याचे म्हटले आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने 26 जानेवारी ते 3 फेब्रुवारी दरम्यान फॅक्स आणि ईमेलद्वारे आपल्या पाकिस्तानी मिशन्सना सांगितले आहे की, काश्मीरमध्ये तैनात असलेल्या भारतीय सुरक्षा दलांविरुद्ध मानवी हक्क उल्लंघनाची खोटी प्रकरणे कशी मांडता येतील, ज्यामुळे भारताविरुद्ध जगाची दिशाभूल होईल. या गुप्त नोटमध्ये यासाठी सर्व व्हिडीओजच्या लिंकही शेअर केल्या आहेत, ज्याचा वापर निदर्शनांदरम्यान आणि सोशल मीडियावर केला जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जगभरातील देशांच्या मीडियाला या खोट्या माहितीचे चांगले कव्हरेज करण्यासाठी योजना तयार करण्यास सांगितले आहे. काश्मीरबाबत पाकिस्तान सरकारने तयार केलेल्या टूलकिटमध्ये काश्मीरसंदर्भातील अनेक चुकीच्या तथ्यांचा आणि बनावट व्हिडिओंचा आधार घेण्यात आला आहे. या बनावट व्हिडिओंमध्ये काश्मीरमधील लोकांना स्वातंत्र्य नाही, त्यांना त्यांच्या घरात कोंडून ठेवण्यात आले आहे आणि भारतीय सुरक्षा दल सामान्य काश्मिरींवर अत्याचार करत असल्याचे सांगण्यात आले आहे.
विशेष म्हणजे पाकिस्तान सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. तिथली परिस्थिती इतकी बिकट आहे की तिथल्या लोकांच्या घरी खायलाही पीठ नाही. असे असतानाही पाकिस्तान काश्मीरचा पेच वाढवण्यासाठी आणि भारताला बदनाम करण्याचे कारस्थान करत आहे.