On This Day In History : इतिहासात आज काय घडलं याची आपल्या सर्वांना उत्सुकता असते. आज म्हणजे 26 ऑक्टोबर रोजी देखील भारतात आणि जगात खूप महत्वाच्या घटना घडल्या होत्या. संत नामदेव महाराज, पत्रकार, समाजसेवी, स्वातंत्रसेनानी गणेश शंकर विद्यार्थी,अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे, संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर अशा दिग्गजांचा जन्म आजच्या दिवशी झाला होता. जम्मू आणि काश्मीरचा भारतात विलय होण्याची ऐतिहासिक घटना आजच्या दिवशी घडली होती. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.
1270 : संत नामदेव महाराजांचा जन्म
संत नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी झाला होता. संत नामदेव हे शिखांच्या गुरू ग्रंथसाहिबातले चरित्रकार, आत्मचरित्रकार आणि ‘कीर्तना’च्या माध्यमातून भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे आद्य प्रचारक होते. त्यामुळे पंजाबी मंडळी तसेच संबंधित मंडळी आज त्यांच्या जन्मस्थानाचा, नरसी नामदेव या गावाचा विकास करण्यासाठी धडपडत आहेत. भक्तशिरोमणी संत नामदेव हे संत ज्ञानेश्वरांच्या कालखंडात होऊन गेले .वारकरी संप्रदायाचे प्रचारक नामदेव महाराज नामवेदाचे व नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील हे एक थोर संत होते. भागवत धर्माचे एक आद्य प्रचारक म्हणून संत नामदेवांनी संत ज्ञानेश्वरांच्या संजीवन समाधीनंतर 50 वर्षे भागवतधर्माचा प्रचार केला.
1881: स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म
स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म आजच्या दिवशी झालेला. पाब्लो पिकासो हे युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होते. पिकासो चित्रकलेतील त्यांच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध आहे. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोंकडे जाते.
1890 : पत्रकार, समाजसेवी, स्वातंत्रसेनानी गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म
गणेश शंकर विद्यार्थी हे एक भारतीय पत्रकार आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते होते. असहकार चळवळ आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. गणेश शंकर यांचा जन्म फतेहपूर जिल्ह्यातील एका हिंदू कायस्थ कुटुंबात झाला. 'प्रताप' हे त्यांचे प्रसिद्ध क्रांतिकारी साप्ताहिक होते. या माध्यमातून त्यांनी अत्याचारित शेतकरी, कामगार आणि दलितांसाठी लढा उभारला. यामुळं त्यांच्यावर अनेक खटले उभारले गेले. त्यांना पाचवेळा तुरुंगवास भोगावा लागला.
1947 - जम्मू आणि काश्मीरचा भारतात विलय
26 ऑक्टोबर 1947 हा दिवस देशासाठी महत्वाचा आहे. देशाचे ऐतिहासिक आणि भौगोलिक स्वरूप ठरवण्यासाठी खूप खास असा हा दिवस आहे. फाळणीनंतर अस्तित्वात आलेल्या पाकिस्तानने काश्मीरवर हल्ला केला. ती परिस्थिती पाहून काश्मीरचे राजा हरी सिंह यांनी 26 ऑक्टोबर 1947 रोजी आपले राज्य भारतात विलीन करण्याचा निर्णय घेतला. यासंबंधीच्या करारावर स्वाक्षरी होताच भारतीय सैन्य जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचले आणि पाकिस्तानविरोधात हल्लाबोल केलाय या युद्धात काश्मीरचा काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात गेला. काश्मीर हे दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणावाचं महत्वाचं कारण राहिले आहे.
1945 : अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन.
अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पटकथालेखिका अपर्णा सेन यांचा जन्म आजच्या दिवशी झाला. अपर्णा सेन या एक बंगाली-हिंदी चित्रपट अभिनेत्री, दिग्दर्शक आणि पटकथालेखक आहेत. 1961 मधील तीन कन्या हा त्यांचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सत्यजित राय यांनी बनवला होता. 36 चौरंगी लेन आणि मिस्टर मिस्टर ॲन्ड मिसेस अय्यर या त्यांच्या चित्रपटांच्या दिग्दर्शनाला त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार-स्वर्ण कमळ पुरस्कार मिळाले.
1994 : ए. एम. अहमदी यांनी भारताचे 26 वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला.
1947 : अमेरिकेच्या 67 व्या परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन यांचा जन्म
1955 :पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांची जयंती
पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर यांची आज जयंती. पंडित दत्तात्रेय विष्णू पलुसकर हे हिंदुस्थानी शास्त्रीय गायनशैलीतले प्रसिद्ध गायक होते. त्यांचे मूळ गाव सांगली जिल्ह्यातले पलुस. अभिजात हिंदुस्तानी संगीतामधील ग्वाल्हेर घराण्याचे पंडित दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुस्कर हे गायकांचे मुकुटमणी आहेत. अल्पायुषी ठरलेला हा गायक आपल्या अद्भुत गानकलेचा वारसा मागे ठेवून गेला. दुर्दैवाने केवळ ३४ वर्षांचे अल्पायुष्य त्यांना लाभले. पण याही छोट्या आयुष्यात पलुस्करांनी पुणे, नाशिक, कुरुंदवाड, कलकत्ता, लखनौ, बनारस, पतियाळा, जालंधर, अमृतसर अशा भारतभरांतील शहरांत शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले.
1937 : संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर यांचा जन्मदिवस
हृदयनाथ मंगेशकर हे प्रसिद्ध मराठी संगीतकार आहेत. नामवंत पार्श्वगायिका लता मंगेशकर आणि आशा भोसले या त्यांच्या थोरल्या बहिणी आहेत. त्यांनी काही निवडक मराठी चानी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग अशा चित्रपटांसाठी तसेच हिंदीतील धनवान, सुबह, मशाल, लेकिन, माया मेमसाब अशा चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन केले आहे. त्यांची ओळख प्रामुख्याने महाराष्ट्राचे 'भावगंधर्व' अशी करून देण्यात येते. मराठी भावसंगीतापलिकडे त्यांनी अमराठी जगतातही गालिबच्या गझला, संत मीराबाई, कबीर, सुरदासांच्या रचना, भगवद्गीतेतील काही श्लोक संगीतबद्ध करून लता मंगेशकर यांच्याकडून गाऊन घेऊन अजरामर केले आहेत.
1954 : अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म
मराठी चित्रपट क्षेत्रात अधिराज्य गाजवणारे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्मदिवस. लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात सर्वांचा लाडका लक्ष्या. सुरुवातीला बेर्डे यांनी मराठी साहित्य संघ या प्रोडक्शन कंपनीत कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर काही मराठी रंगमंच नाटकांत त्यांनी भूमिका साकारल्या. धूमधडाका, थरथराट, दे दणादण, अशी ही बनवाबनवी, हमाल दे धमाल, गोडीगुलाबी, जनता जनार्दन, आपला लक्षा, खतरनाक, आधारस्तंभ, देखणी बायको नाम्याची, पछाडलेला अशा शंभरहून अधिक सिनेमांत त्यांनी धडाकेबाज भूमिका साकारली आहे. तर गीत, गुमराह, हम आपके है कौन, क्रिमिनल, हमेशा हम तुम्हारे है सनम, साजन, बेटा, आरजू, अनाडी, हंड्रेड डेज यासह कित्येक हिंदी सिनेमांत देखील त्यांनी भूमिका वठवली आहे. वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी मूत्रपिंडाच्या विकाराने लक्ष्मीकांत बेर्डे यांचे 16 डिसेंबर 2004 रोजी निधन झाले.
1930 : प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. वाल्डेमर हाफकिन यांचा मृत्यू.
1974 : अभिनेत्री रवीना टंडनचा जन्म
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचा जन्म आजच्याच दिवशी झालेला. 1992 साली तिने पत्थर के फूल या हिंदी चित्रपटात सलमान खानच्या नायिकेची भूमिका करून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला. तेव्हापासून तिने अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका केल्या. परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां इत्यादी तिचे काही चित्रपट आहेत.