Begusarai News: बिहारमधील बेगुसरायमध्ये (Bihar Crime News) रेल्वे ट्रॅकवर प्रेमी युगुलाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या दिवशीच ही घटना घडली. बेगुसराय रेल्वे स्थानकापासून तीन किलोमीटर अंतरावर रेल्वे रुळावर प्रेमी युगुलाचा मृतदेह स्थानिक लोकांनी पाहिला. मृतदेह मिळाल्याचं कळताच ही गोष्ट संपूर्ण परिसरात पसरली. प्रेमप्रकरणातून ऑनर किलिंगची (Honour Killing) शक्यता व्यक्त केली जात असून मुलीच्या सरपंच आईवर हत्येचा आरोप लावण्यात आला आहे. तर सरपंच असलेल्या मुलीच्या आईनं मात्र आरोप फेटाळून लावला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जात तपास सुरू केला आहे..
सरपंचाची मुलगी आणि तिच्या प्रियकराचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर सापडला
राम नुनू पासवान आणि रूपम कुमारी अशी मृत प्रेमयुगुलांची नावं आहेत. अयोध्या बारी (Ayodhya Bari) येथील सरपंचाची मुलगी रूपम कुमारी आणि राम नुनू पासवान या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं. राम नुनू हा अनेक वर्षांपासून सरपंचाकडे ड्रायव्हर म्हणून काम करत होता. या मुलीच्या आई-वडिलांना तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच रामला नोकरीवरून काढून टाकण्यात आले. त्याला नोकरीवरुन काढल्यानंतरही ते दोघे भेटायचे.
काही ग्रामस्थांचं म्हणणं आहे की, सरपंच आईला तिचा मान-सन्मान प्रिय होता. तिनं आधी या दोघांनाही समजावून सांगितलं. त्यानंतरही त्यांनी ऐकलं नाही. त्यामुळं या दोघांना संपवण्याचा घाट घातला, असा संशय व्यक्त केला जात आहे. या हत्येचे वृत्त समजताच गावकऱ्यांनी मृतदेह राष्ट्रीय महामार्ग 31 वर ठेवून राष्ट्रीय महामार्ग रोखला. बराच वेळ यामुळं गदारोळ झाला. हत्येनंतर लोक संतापलेले पाहून मुलीच्या आईवडिलांनी लाखो पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केले आहे.
पोलिसांकडून कसून तपास सुरु
प्रेमी युगुलाचा मृतदेह सापडल्याची माहिती मिळताच लाखो एसएचओ प्रमोद कुमार दलबलसह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. एसएचओ प्रमोद म्हणाले की, मुलीच्या आईवडिलांवर आरोप केले जात आहेत. या दोघांनाही पोलीस ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहोत. त्यानंतरच घटनेची सविस्तर माहिती मिळेल.
सरपंच आईनं आरोप फेटाळले
तर मुलीची सरपंच आई अनिता देवी यांनी सांगितले की, या हत्येशी आमचा काहीही संबंध नाही. या दोघांमध्ये बरेच दिवस प्रेमसंबंध सुरू होते. याबाबत माहिती मिळाली. यानंतर राम नुनूला कामावरून काढून टाकण्यात आले. या दोघांनी आत्महत्या केली, असं अनिता देवींनी सांगितलं.