मुंबई: भारताच्या इतिहासात आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आजच्याच दिवशी भारताला, स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच युद्धाला सामोरं जावं लागलं होतं. भारत आणि चीन या दोन देशादरम्यान सुरू असलेल्या सीमावादाचं रुपांतर 20 ऑक्टोबर 1962 रोजी युद्धात झालं. तिबेटचे दलाई लामा यांना भारतात आश्रय दिल्याच्या रागातून चीनने भारतावर हल्ला केला आणि या युद्धाला सुरूवात झाली. इतिहासात आज इतर कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या पाहुयात,
1567- अकबराने चित्तोडगडवर हल्ला केला
मुघल सम्राट अकबराने 20 ऑक्टोबर 1567 रोजी राजस्थानमधील महाराणा उदयसिंह द्वितीय यांच्या चित्तोडगडावर हल्ला केला. पण या हल्ल्याआधीच महाराणा उदयसिंह या किल्ल्यातून बाहेर पडले होते. त्यांचा सेनापती जयमल त्याच्या 8000 सैन्यासह या किल्ल्यामध्ये होता. या युद्धामध्ये अकबराचा विजय झाला. 23 फेब्रुवारी 1568 रोजी अकबराने हा किल्ला ताब्यात घेतला.
1921- फ्रान्स आणि तुर्कीमध्ये अंकारा करार
1962- भारत आणि चीन युद्धाला सुरुवात
भारताने तिबेटचे धर्मगुरू दलाई लामा यांना 1959 साली आश्रय दिल्यानंतर चीनचा तिळपापड झाला. नेफा म्हणजे आता अरुणाचल प्रदेश हा तिबेटचा हिस्सा असून तो चीनचा प्रांत असल्याचा दावा आधीपासूनच चीनकडून करण्यात येत होता. तसेच लडाखचा परिसरही चीनचा असल्याचा दावा चीनने केला होता. त्यामुळे भारत आणि चीनमध्ये या दोन्ही प्रदेशावरुन सीमावाद सुरू होता. दलाई लामांना आश्रय दिल्याच्या रागातून चीनने भारतावर हल्ला केला. चीनच्या सेनेने 20 ऑक्टोबर 1962 रोजी लडाख आणि मॅकमोहन रेषेवरून एकसाथ भारतावर हल्ला केला आणि युद्धाला सुरूवात झाली. बर्फाच्छादीत, दुर्गम आणि पहाडी परिसर असल्यामुळे या ठिकाणी भारताचे कमी संख्येने सैन्य तैनात होते. चीनने सर्व तयारी करून मोठ्या लष्करासह हल्ला केला. त्यामुळे या युद्धामध्ये भारताला नामुष्कीजनक माघार घ्यावी लागली होती.
1973- ऑस्ट्रेलियाचे ऑपेरा हाऊस नागरिकांसाठी खुलं
ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध असलेल्या सिडनी ऑपेरा हाऊस हे 20 ऑक्टोबर 1973 रोजी नागरिकांसाठी खुलं करण्यात आलं. डेन्मार्कच्या एका वास्तुशिल्पकाराने या ऑपेरा हाऊसचे डिझाईन केलं होतं. याचं उद्धाटन महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी केलं होतं.
1973- वॉटरगेट प्रकरणाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांना निक्सन यांनी हटवलं
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर वॉटरगेट प्रकरणी आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाचा तपास करणारे न्याय विभागाचे अधिकारी आर्चिबाल्ड कोक्स यांना निक्सन यांनी पदावरुन हटवलं. त्यानंतर याचा निषेध म्हणून अटॉर्नी जनरल एलियट रिचर्डसन आणि डेप्युटी अटॉर्नी जनरल विलियम डी रुकेलशॉस यांनी राजीनामा दिला. या घटनेला 'सॅटर्डे ऑफ मासेकर' असं म्हटलं जातंय.
2002- जगातील सर्वात खोलवर असलेल्या गॅस पाईपलाईनचे तुर्कीमध्ये उद्धाटन
जगातल्या सर्वात खोलवर असलेली गॅस पाईपलाईन अशी ओळख असलेल्या तुर्की गॅस पाईपचं उद्धाटन आजच्या दिवशी म्हणजे 20 ऑक्टोबर 2002 रोजी करण्यात आलं.