Prashant Kishor Big Statement: अलीकडेच नितीश कुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडीसोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली आहे. मात्र आता बिहारमध्ये पुन्हा एकदा राजकीय समीकरण बदलू शकतं. कारण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपच्या संपर्कात आहे, असा दावा राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. याबाबत बोलताना प्रशांत किशोर म्हणाले आहेत की, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संपर्कात आहेत. परिस्थिती बदलल्यास ते पुन्हा युती करू शकतात. मात्र नितीश कुमार यांचा पक्ष जनता दलने (यू) त्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे. प्रशांत किशोर हे दिशाभूल करून त्यांचा उद्देश राजकीय संभ्रम निर्माण करण्याचा असल्याचं जेडीयूने म्हटले आहे.
प्रशांत किशोर हे सध्या बिहारमध्ये पदयात्रा करत आहेत. सक्रिय राजकारणात येण्याचे पहिले पाऊल म्हणून त्यांच्या या यात्रेकडे पाहिले जात आहे. त्यांनी पीटीआयला सांगितले की, नितीश कुमार यांनी खासदार आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांच्यामार्फत भाजपशी संवादाचा मार्ग खुला ठेवला आहे. या संदर्भात हरिवंश यांना त्यांच्या प्रतिक्रियेसाठी पाठवलेल्या प्रश्नावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांच्या पक्षाने हा दावा फेटाळून लावला असून कुमार हे पुन्हा कधीही भाजपशी हातमिळवणी करणार नाही, असं म्हटलं आहे.
संभ्रम निर्माण करण्यासाठी त्यांनी हा दावा केला: जेडीयू
प्रशांत किशोर यांच्या दाव्यावर जेडीयूचे प्रवक्ते केसी त्यागी म्हणाले की, नितीश कुमार यांनी जाहीरपणे सांगितले आहे की ते आयुष्यात पुन्हा कधीही भाजपशी हातमिळवणी करणार नाहीत. त्यागी म्हणाले, 'आम्ही त्यांच्या दाव्याचे खंडन करतो. नितीश कुमार 50 वर्षांपासून सक्रिय राजकारणात आहेत. तर किशोर सहा महिन्यांपासून आहेत. किशोर यांनी संभ्रम निर्माण करण्यासाठी अशी दिशाभूल करणारे वक्तव्य केले आहे. दरम्यान, प्रशांत किशोर यांनी 2 ऑक्टोबर रोजी पश्चिम चंपारण येथील भितिहारवा येथील गांधी आश्रमातून पदयात्रा सुरू केली आहे. या यात्रेत ते येत्या 12-15 महिन्यांत 3,500 किमीचा प्रवास करणार आहेत. प्रशांत किशोर हे जवळपास 18 महिने जेडीयूमध्ये होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला भाजपला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी कुमार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर 2020 मध्ये त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती.
इतर महत्वाची बातमी: