On This Day In History : 18 नोव्हेंबर म्हणजेच आजच्याच दिवशी देशात व विदेशात काही महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या, सोबतच काही प्रसिध्द व्यक्तींचा जन्म झाला होता. इतिहासात आजच्या दिवशी घडलेल्या संपूर्ण महत्वपूर्ण बाबींचा आढावा आपण आजच्या दिनविशेषमार्फत घेणार आहोत.  थोरले पेशवा माधवराव यांचं आजच्याच दिवशी निधन झालं होतं. आजचा दिवस देशभरात निसर्गोपचार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. हे पाचवे वर्ष आहे. आज व्ही शांताराम यांचा जन्मदिवसही आहे. आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत.


निसर्गोपचार दिवस -
18 नोव्हेंबर हा दिवस भारतामध्ये निसर्गोपचार दिवस (National Naturopathy Day) म्हणून साजरा करण्यात येतो. आजचा हा पाचवा निसर्गोपचार दिवस आहे. 2018 मध्ये आयुष मंत्रालयानं निसर्गोपचार दिवसाची  (आयुर्वेद, योग आणि निसर्गोपचार, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी) सुरुवात केली.  


वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा -
एकेकाळी भारतामध्ये वाघांची संख्या मोठ्या प्रमाणावर होती. इंग्रजांच्या काळात संस्थांनिक आणि इंग्रजी अधिकाऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या शिकारीमुळे आणि स्वातंत्र्यानंतर वाढलेल्या तस्करीमुळे देशातील वाघांची संख्या झपाट्यानं कमी झाली. वाघ हा अन्नसाखळीमधील सर्वात महत्वाचा घटक असल्यामुळे त्याच्या घटत्या संख्येचा परिणाम पर्यावरणावर होऊ लागला. त्यामुळे वाघांना शिकारींपासून संरक्षण देण्यासाठी आणि वाघांची संख्या वाढवण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात आली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 18 नोव्हेंबर 1972 रोजी वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिला. सध्या देशात वाघांची संख्या दोन हजारांपेक्षा जास्त आहे. प्रत्येक दोन वर्षाला देशात व्याघ्र जनगणना केली जाते. 


थोरले पेशवा माधवराव यांचं निधन - 
1771 मध्ये मोहम्मद शाह अब्लादी आणि मराठ्यांमध्ये पानीपतचं तिसरं युद्ध झालं होतं. यामध्ये मराठ्यांचा मोठा पराभव झाला होता. यामध्ये सदाशिव भाऊ यांचा मृत्यू झाला होता. या युद्धामध्ये मराठ्यांचं प्रचंड नुकसान झालं होतं. या पराभवाचा माधवराव पेशवे यांना दु:ख झालं होतं. 18 नोव्हेंबर 1772 रोजी थोरले माधवराव पेशवे यांचं निधन झालं. त्यानंतर पेशवा माधवराव यांचे छोटे बंधू नारायणराव ह्यांनी पेशवा पदाची सूत्रे सांभाळली होती.


बटुकेश्वर दत्त यांचा जन्म
प्रसिध्द भारतीय क्रांतिकारी बटुकेश्वर दत्त यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1910 रोजी झाला होता. भगतसिंह यांच्यासोबत दिल्लीमधील अॅसेम्बलीमध्ये (केंद्रीय विधिमंडळात ) बॉम्ब फेकून ब्रिटिश सत्तेचा निषेध केला होता. ब्रिटिशांनी आणलेल्या तीन कायद्याविरोधात भगतसिंह यांच्यासोबत लढा दिला होता. याप्रकरणी खटला चालवून शिक्षा सुनावण्यात आली होती.   बॉम्ब हल्ल्याच्या प्रकरणानंतर काही काळासाठी त्यांना लाहोर जेलमध्ये भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांसह ठेवण्यात आले.


नासाने मंगळावर मावेन यान पाठवले -
18 नोव्हेंबर 2013 रोजी अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने मंगळ ग्रहावर मावेन हे यान पाठवले होते.  केप कॅनेवर या स्पेश स्टेशनवरुन मावेन यानं पाठवण्यात आलं होतं.  मार्स एटमोस्फेयर एंड वोलेटाइल इवोल्युसन (Mars Atmosphere and Volatile EvolutioN असा मावेनचा अर्थ होतो. मंगळ ग्रहावरील पाणी आणि वायुमंडळाची माहिती घेण्यासाठी नासाने मावेन यान पाठवलं आहे.  22 सप्टेंबर 2014 रोजी हे यानं मंगळाच्या कक्षामध्ये पोहचलं.  यासाठी तेव्हा US$582.5 मिलियन खर्च झाला होता. 


मानुषी छिल्लर मिस वर्ल्ड
आजच्याच दिवशी 2017 मध्ये मानुषी छिल्लर हिने जागतिक सुंदरी हा पुरस्कार प्राप्त केला होता. मानुषीनं दक्षिण अफ्रिका, व्हियतनाम, इंडोनेशिया आणि फिलिपिन्सच्या सौंदर्यवतींना मागे टाकत हा किताब पटकावला. चीनमध्ये झालेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धेसाठी जवळपास 130 देशातून सौंदर्यवतींना सहभागी झाले होते. मानुषी छिल्लर ही मुळची दिल्लीची रहिवासी आहे. मानुषी छिल्लरनं सम्राट पृथ्वीराज या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेय. 1994 मध्ये ऐश्वर्या रायने मिस वर्ल्ड हा किताब पटकावला. डायना हेडन (1997),  युक्ता मुखी (1999) आणि प्रियंका चोप्राने 2000 यांनीही मिस वर्ल्ड हा खिताब पटकावलाय. 


व्ही शांताराम यांचा जन्म -
चित्रपट निर्माते, निर्देशक व अभिनेते व्ही शांताराम यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापुरात झालाय. व्ही. शांताराम यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत नोकरी केली. 1921 मध्ये सुरेखा हरण या मूक चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्यांनी प्रभात फिल्म कंपनीतही काम केले होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली.  भारतीय चित्रपटाला दिशा देण्याचे त्यांनी भरीव कार्य केले.  व्ही शांताराम यांच्या नावानं पुरस्कार दिला जातो.  नवरंग, पिंजरा, दो आँखे बारह हाथ, चानी, बूंद जो बन गये मोती, गीत गाया पत्थरों या त्यांच्या चित्रपटांनी रसिकांच्या काळजाचा ठाव घेतात. त्यांच्या अनेक चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. कलात्मक चित्रपटनिर्मिती हे व्ही. शांताराम यांचे खास वैशिष्ट्य समजले जाते. विषयांचे वेगळेपण हेदेखील त्यांच्या चित्रपटांचे आणखी एक वैशिष्ट्य होय. पद्मश्री या पुरस्कारानं त्यांना केंद्र सरकारनं सन्मानीत केलेय.