मुंबई : सदाबहार गायक किशोर कुमार यांच्या आवाजाची जादू आजही भारतीयांच्या हृदयावर राज्य करतो. त्यांचा अप्रतिम आवाज अनेकांच्या मनाची तार छेडतो. प्रेमगीत असो वा वेदनांचा स्पर्श असलेलं गाणं, किंवा एनर्जेटिक गाणं, त्यांच्या आवाजाचा चाहतावर्ग वेगळाच आहे. गायिकेसोबतच त्यांनी आपल्या अभिनयाची छापही सोडली आहे. याच किशोर कुमार यांचं निधन 13 ऑक्टोबर 1987 रोजी झालं होतं. तसेच अमेरिकेचे पॉवर हाऊस अशी ओळख असलेल्या व्हाईट हाऊसची पायाभरणीही इतिहासात आजच्या दिवशीच म्हणजे 13 ऑक्टोबर रोजी झाली होती. त्या अर्थाने 13 ऑक्टोबर हा दिवस देशाच्या आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे.
जाणून घेऊया इतिहासात आजच्या दिवशी काय घडलं होतं,
1792- अमेरिकेच्या व्हाईट हाऊसची पायाभरणी
अमेरिकेचे शक्तिस्थान आणि ओळख असणाऱ्या व्हाईट हाऊसची (White House) 13 ऑक्टोबर 1792 रोजी पायाभरणी करण्यात आली. त्यानंतर सुमारे आठ वर्षानंतर, म्हणजे नोव्हेंबर 1800 मध्ये या वास्तूचे बांधकाम पूर्ण झालं. व्हाईट हाऊस हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असून त्यांचे कार्यालयही त्याच ठिकाणी आहे.
1911- मार्गारेट नोबेल उर्फ भगिनी निवेदिता यांचे निधन
स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या मार्गारेट एलिझाबेथ नोबेल यांचे 13 ऑक्टोबर 1911 रोजी निधन झालं. त्यावेळी त्या अवघ्या 43 वर्षांच्या होत्या. स्वामी विवेकानंद यांनी त्यांना भगिनी निवेदिता (Sister Nivedita) हे नाव दिलं. भगिनी निवेदिता यांनी आयुष्यभर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रसार केला.
1987- सदाबहार गायक किशोर कुमार यांची पुण्यतिथी
रुपेरी पडद्यावर ज्या कलाकारांनी आपला ठसा उमटवला आहे अशा लोकांच्या यादीचा विचार केल्यास त्यामध्ये किशोर कुमार (Kishor Kumar) यांचं नाव सर्वात वरती येईल हे नक्की. एक अभिनेता, शानदार गायक, निर्माता, पटकथाकार आणि अप्रतिम संगीतकार अशा विविध गुणांनी संपन्न असलेले किशोर कुमार घराघरात पोहोचले आहेत. दर्दभरे गाणी असतील वा सुंदर प्रेमगीतं किंवा उत्साही आणि उर्जेने भरलेली गीतं... या सर्वांमध्ये किशोर कुमार हे चपखलपणे गाणं गायचे. त्यांनी हिंदी व्यतिरिक्त इतर अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली. बॉलिवूडमधील हरहुन्नरी गायकाचे 13 ऑक्टोबर 1987 रोजी निधन झालं.
1999- अटल बिहारी वाजपेयी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले
13 ऑक्टोबर 1999 रोजी अटल बिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांचं पहिल्यांदा सरकार 13 दिवसात (16 मे ते 1 जून 1996) पडलं होतं. त्यानंतर दुसऱ्यांदा ते पंतप्रधान झाले, ते सरकार 13 महिन्यांनी पडलं. तिसऱ्यांदा, 1999 साली ते तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांचे हे सरकार 22 मे 2004 पर्यंत टिकलं. हिंदी कवी, पत्रकार आणि प्रभावी वक्ते असलेले अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होते.
2016- अमेरिकन गायक बॉब डिलन यांना साहित्याचा नोबेल
प्रख्यात गायक, गीतकार आणि लेखक अशी ओळख असलेल्या बॉब डिलन (Bob Dylan) यांना 13 ऑक्टोबर 2016 रोजी साहित्याचा नोबेल मिळाला. बॉब डिलन यांचं मूळ नाव रॉबर्ट अॅलन जिमरमॅन असं आहे. पॉप संगीतात त्यांचं मोठं योगदान असून 2000 साली त्यांना ऑस्कर पुरस्कार मिळाला.