मुंबई : आज 12 ऑक्टोबर असून आज भारताचे स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि प्रख्यात समाजवादी राजकारणी डॉ. राम मनोहर लोहिया यांची पुण्यतिथी आहे. राम मनोहर लोहिया यांनी सार्वजनिक जीवनात समाजवादी राजकारणात अशी एक रेषा ओढली, जी आज लोहियावाद म्हणून ओळखली जाते. 23 मार्च 1910 रोजी जन्मलेल्या लोहिया यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या सरकारविरोधातही आवाज उठवला. लोहिया यांचे संपूर्ण जीवन चढ-उतारांनी भरलेले होते. 12 ऑक्टोबर 1967 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला. आजच्याच दिवशी पाकिस्तानातील नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून परवेझ मुशर्रफ यांनी सत्ता काबीज केली. पाकिस्तानच्या इतिहासात या दिवसाची लष्करप्रमुखांच्या हस्ते बंडाचा दिवस म्हणून नोंद आहे. या दिवशी 1999 मध्ये देशाचे तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे सरकार उलथवून राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली होती.
1492: ख्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडिजमधील बहामाज येथे पोचला. मात्र आपण भारतात पोहोचलो आहोत, असा त्याचा समज झाला.
ख्रिस्तोफर कोलंबस याने 12 ऑक्टोबर 1492 मध्ये अमेरिका नावाची भूमी शोधली. मात्र तिथे पोहोचवल्यावर आपण भारतात पोहोचलो असल्याचा त्याचा समज झाला. त्याने तेथील लोकांना इंडियस (भारतीय) म्हणून संबोधले. असे म्हटले जाते की, त्याच्या मृत्यूपर्यंत कोलंबसला असा विश्वास होता की त्याने आशियाचा शोध लावला होता.
1922: कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म
शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 साली पुणे जिल्ह्यातील इंदापूर गावी झाला. त्यांचे शिक्षण पुण्यात झाले. आचार्य अत्र्यांच्या नवयुगमध्ये 5 वर्षे उपसंपादक राहिल्यानंतर त्यांनी नागपुरातील हिस्लॉप महाविद्यालय, तसेच मुंबईतील रुईया व महर्षी दयानंद महाविद्यालयांमध्ये मराठीच्या अध्यापिका म्हणून काम केले. आळंदी येथे 1996 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या. शांता शेळके यांनी मराठी साहित्यात कविता, कथा, कादंबरी, चरित्र रेखाटन, मुलाखती, समीक्षण, प्रस्तावना या स्वरूपात योगदान दिले आहे.
1993: राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना.
भारताचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोग ही एक स्वायत्त कायदेशीर संस्था आहे. याची स्थापना 12 ऑक्टोबर 1993 रोजी झाली. हे मानवी हक्क संरक्षण कायदा, 1993 अंतर्गत स्थापित केले गेले. हा आयोग देशातील मानवाधिकारांचे संरक्षण करण्यासाठी स्थापित करण्यात आला आहे. ही एक बहुसदस्यीय संस्था आहे. याचे पहिले अध्यक्ष न्यायमूर्ती रंगनाथ मिश्रा होते.
1999: संयुक्त राष्ट्र लोकसंख्या अहवालाच्या अंदाजानुसार, आजच्याच दिवशी जगाची लोकसंख्या सहा अब्ज इतकी झाली
संयुक्त राष्ट्र लोकसंख्या अहवालाच्या अंदाजानुसार, आजच तो दिवस होता जेव्हा जगाची लोकसंख्या सहा अब्जांच्या वर पोहोचली होती. त्यावेळी यूनच्या वतीने काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी बोस्नियनमध्ये जन्मलेल्या मुलाला सहा अब्जवं मुलं असल्याचं जाहीर करण्यात आलं.
2002 : दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमध्येदोन बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 202 जण ठार, तर 300 जण जखमी झाले.
12 ऑक्टोबर 2002 मध्ये बाली येथील दोन नाइटक्लबमध्ये दहशतवादी हल्लात 202 लोक मारले गेले. ज्यात बहुतेक परदेशी पर्यटक होते. तसेच इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथेही बॉम्बस्फोट घडले.