8 नोव्हेंबरला 2 हजार रुपयांच्या 4 लाख 94 हजार 640 कोटींच्या नोटा छापून तयार होत्या, अशी माहिती आरबीआयने गलगलींना दिली.
नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांसह रिझर्व्ह बँकेलाही 500 आणि 1000 रुपयांच्या 20 लाख 51 हजार 166.52 कोटी चलनावर पाणी सोडावं लागलं.
भारतीय रिजर्व बँकेने त्यांच्याकडे असलेल्या स्टॉकच्या एक चतुर्थांश चलनाची छपाई केली.
नोटाबंदी दिवशी RBI ची स्थिती
- ज्या दिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदीची घोषणा केली, त्यावेळी भारतीय रिजर्व बँकेकडे, 500 रुपयाची एकही नवी नोट नव्हती.
- नव्या 2000 रुपयांच्या 24 हजार 732 कोटी नोटा ज्याची किंमत 4,94,640 कोटी होती.
- याउलट ज्यादिवशी म्हणजे 8 नोव्हेंबर रोजी नोटबंदी केली, त्यावेळी आरबीआयकडे 10, 20, 50, 100, 500 आणि 1000 रुपये मूल्यांच्या एकूण चलनाची संख्या 12,42,300.1 कोटी होती. तर त्याची एकूण किंमत 23,93,753.39 कोटी होती.
- यात 500 आणि 1000 मूल्यांच्या चलनाची संख्या 3,18,919.2 कोटी होती, ज्याची एकूण किंमत 20,51,166.52 कोटी होती.
म्हणजे एकूण चलनापैकी 86 टक्के चलन नोटबंदीमुळे रद्द झाले होते. प्रत्यक्षात आरबीआयने फक्त नवीन 2000 रुपयांच्या 24732 कोटी नोटांची छपाई केली, ज्याची किंमत 4,94,640 कोटी आहे.
अविवेकी निर्णय : गलगली
अनिल गलगली यांच्या मते, आरबीआयच्या माहितीच्या आधारे शासनाने इतका मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचा अभ्यास केला नाही, ना व्यावहारिक दृष्टिकोणातून काम केले. कारण भारतीय रिजर्व बँकेकडे चलन होते, त्यापैकी 86 टक्के चलन रद्द झाले आणि त्यांच्या पूर्तीसाठी शासनाने 24.11 टक्याच्या फक्त 2000 रुपये मूल्याचे चलन छापले आहे.
अनिल गलगली यांनी हा अविवेकी निर्णय असल्याचं म्हटलं असून, भविष्यात अशाप्रकारच्या आपत्कालीन प्रसंगातून सावरण्याचे आवाहन शासनास केले आहे.