मुंबई : ओमायक्रॉन व्हेरियंटचा फटका शेअर मार्कटला बसला असून सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर मार्केटमध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे सोमवारी एकाच दिवसात गुंतवणूकदारांना तब्बल 5.80 लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स आज 949.32 अंकांनी (1.65%) घसरून 56747 वर बंद झाला.
शुक्रवार आणि सोमवारचा विचार करता मुंबई शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलायझेशन हे 5,80,016.37 कोटी रुपयांनी घटून 2,56,72,774.66 कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. निफ्टी 284 अंकांनी (1.65%) घसरून 16912 वर बंद झाली आहे. शेअर मार्केटला ओमायक्रॉनचा चांगलाच फटका बसल्याचं मत शेअर मार्केटमधील तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची भीती व्यक्त केल्यामुळे शेअर मार्केटवर परिणाम झाला.
भारतामध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे 21 रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी 17 रुग्ण हे सोमवारी सापडले आहेत. ऑटो क्षेत्रात मारुती सुझुकी, अशोक लेलँड, टाटा मोटर्स, टीव्हीएस मोटर्स, एस्कॉर्ट, महिंद्रा अँड महिंद्रा, हिरो मोटो कॉर्प यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. तर आयटीला देखील या घसरणीचा फटका बसला असून एल अँड टी इन्फोटेक, टीसीएस, एचसीएल टेक्नॉलॉजी, इन्फोसिस, विप्रो या कंपन्यांचे शेअर घसरले आहेत.
इंडस इंड बँकेच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घट झाली असून 4 टक्क्यांपर्यंत घसरणीची नोंद झाली आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्समध्ये जवळपास 1.35 टक्क्यांची घट झाल्याचं दिसून आलं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या :