Odisha Train Accident: ओडिशामध्ये (Odisha) झालेल्या भीषण अपघातात (Odisha Train Tragedy) आतापर्यंत तब्बल 261 जणांचा मृत्यू झाला आहे. तर तब्बल 900 हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत. ओडिशातील अपघात (Odisha Accident)  आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात असल्याचं बोललं जात आहे. आतापर्यंतच्या कोणत्याही रेल्वे अपघातात (Railway Accident) एवढी मोठी जीवितहानी झालेली नव्हती. अशातच अपघात झाल्यापासूनच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी सोशल मीडियावर केली जात आहे. तर दुसरीकडे 1956 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी केवळ रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारत दिलेल्या राजीनाम्याची जोरदार चर्चा होत आहे. ते केंद्रीय रेल्वेमंत्री म्हणजे, लाल बहादुर शास्त्री. 


गोष्ट आहे 67 वर्षांपूर्वीची... दिवस होता 1956 सालचा ऑगस्ट महिन्याचा... आंध्रप्रदेशमधील महबूबनगरमध्ये भीषण रेल्वे अपघात झाला, ज्यामध्ये 112 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यावेळी तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्रींनी नैतिक जबाबदारी स्विकारत पदाचा राजीनामा दिला होता. परंतु, तत्कालीन पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी लाल बहादूर शास्त्रींचा तो राजीनामा स्विकारला नव्हता. पण त्याचवर्षी आंध्रप्रदेशमधील महबूबनगर रेल्वे अपघातानंतर आणखी एक रेल्वे अपघात झाला तो अरियालूर येथे. अरियालूर रेल्वे अपघातात 114 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतरही तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी घटनेची नैतिक जबाबदारी स्विकारत पुन्हा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंकडे आपला राजीनामा दिला. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान नेहरुंनी राजीनामा स्वीकारला. लाल बहादूर शास्त्रींनी दुसऱ्यांदा दिलेला राजीनामा स्वीकारताना पंतप्रधान नेहरुंनी सांगितलं की, हे एक उदाहरण म्हणून राहावं यासाठी मी राजीनामा स्विकारतोय. 


तीस खासदारांनी केलेली नेहरुंना राजीनामा न स्विकारण्याची विनंती 


तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री लाल बहादूर शास्त्रींनी दोन्ही अपघातांची नैतिक जबाबदारी स्विकारताना दिलेला राजीनामा स्विकारु नका, अशी विनंती त्यावेळच्या तीस लोकसभा खासदारांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरुंकडे केली होती. शास्त्रींनी अपघाताची नैतिक जबाबदारी स्विकारत राजीनामा दिला, याबाबत त्यांचं कौतुक केलं पाहिजे, मात्र त्यांचा राजीनामा स्विकारु नये, असं खासदारांचं म्हणणं होतं. रेल्वेमंत्री म्हणून लाल बहादूर शास्त्री वैयक्तिकरित्या दुर्घटनेसाठी जबाबदार नव्हते. दुर्घटना तांत्रिक बिघाडामुळे झाली होती. त्यामुळे या रेल्वे दुर्घटनेची जबाबदारी रेल्वे प्रशासनानं घेणं गरजेचं आहे, असं खासदारांचं मत होतं. 


रेल्वे अपघाताची नैतिक जबाबदारी स्वीकारून शास्त्री यांचा राजीनामा देण्याचा निर्णय, अनेकदा मंत्र्यांना त्यांच्या नैतिक जबाबदारीची आठवण करून देण्यासाठी आठवणीत आणून दिला जातो. पण आतापर्यंत फारच कमी नेत्यांनी आपली नैतिक जबाबदारी ओळखून लाल बहादूर शास्त्रींच्या निर्णयाचं अनुकरण केलं आहे. अशातच ओडिशा दुर्घटनेनंतर सोशल मीडियावरुन होणारी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या राजीनाम्याची मागणी, पुन्हा एकदा लाल बहादूर शास्त्री आणि त्यांनी स्विकारलेल्या नैतिक जबाबदारीची आठवण करुन देते.