Toor and Urad Dal Price : दिवसेंदिवस महागाई वाढताना दिसत आहे. डाळींचे भाव सातत्याने वाढताना दिसत असून महत्त्वाचं म्हणजे तूर (Toor Dal) आणि उडीद (Urad Dal) डाळीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. यामुळे सर्वसामान्य मेटाकुटीला आले आहेत. गेल्या काही काळापासून अन्नधान्याच्या किमतीत विक्रमी वाढ पाहायला मिळत आहे. आता केंद्र सरकारने यावर उपाय म्हणून मोठं पाऊल उचललं आहे. यामुळे नागरिकांनी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 


डाळीच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारचं पाऊल


केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळीच्या वाढत्या किमतीला आळा घालण्यासाठी विशेष पाऊल उचललं आहे, यामुळे ग्राहकांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे डाळींचे भाव घसरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सरकारने साठेदारीवर तोडगा म्हणून मर्यादा लागू केली आहे. केंद्र सरकारने घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, आयातदार आणि मिलर्सकडे ठेवलेल्या तूर आणि उडीद डाळीवर स्टॉक मर्यादा लागू केली. यामुळे साठा कमी होईल, त्यामुळे तूर आणि उडदाचे भाव घसरतील किंवा भाव स्थिर राहू शकतात. ऑक्टोबरपर्यंत साठ्यावर मर्यादा लागू करण्यात आली आहे.


तूर आणि उडदाचे भाव कडाडले


केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने तात्काळ साठवण क्षमतेसंदर्भात आदेश लागू केले आहेत. बेहिशेबी साठेदारीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने हे कडक पाऊल उचललं आहे. शुक्रवारी तूर डाळीची सरासरी किरकोळ किंमत 19 टक्क्यांनी वाढून 122.68 रुपये प्रति किलो झाली. एका वर्षापूर्वी ही किंमत 103.25 रुपये प्रति किलो होती. दुसरीकडे, उडीदाची सरासरी किरकोळ किंमत 5.26 टक्क्यांनी वाढून 105.05 रुपयांवरून 110.58 रुपये प्रति किलो झाली आहे.


किरकोळ विक्रेत्यांसाठी साठवणीवर मर्यादा


तूर आणि उडदसाठी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत स्टॉक मर्यादा म्हणजेच साठवण मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या आदेशानुसार तूर आणि उडदाची साठा मर्यादा घाऊक विक्रेत्यांसाठी 200 टन, किरकोळ विक्रेते आणि किरकोळ दुकानदारांसाठी पाच टन आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी डेपोमध्ये 200 टन ठेवण्यात आली आहे. पीटीआयच्या रिपोर्टनुसार, ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंह यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.


पोर्टलवर स्टॉक लिमिट अपलोड करण्याचे आदेश


मिलर्स म्हणजे गिरणी मालकांच्या बाबतीत, साठवणीची मर्यादा उत्पादनाच्या शेवटच्या तीन महिन्यांसाठी किंवा वार्षिक उत्पादन क्षमतेच्या 25 टक्के असेल. आयातदारांना सीमाशुल्क मंजुरीच्या तारखेपासून 30 दिवसांपेक्षा जास्त स्टॉक ठेवण्याची परवानगी नाही. मंत्रालयाने ग्राहक व्यवहार विभागाला पोर्टलवर (https://fcainfoweb.nic.in/psp) साठवण मर्यादेची माहिती अपलोड करण्यास सांगितली आहे.


डाळींचं उत्पादन घटण्याचा अंदाज


कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, देशातील डाळींचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. यंदा 2022-23 जुलै-जून या सत्रात तूर उत्पादन 3.43 दशलक्ष टन असण्याचा अंदाज आहे. मागील वर्षी तूर उत्पादन 4.22 दशलक्ष एवढं होतं. दुसरीकडे, उडदाचे उत्पादन 2.77 दशलक्ष टनांवरून 2.61 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Pulses Rates : आता वरण-भात महागणार! डाळींच्या दरामध्ये झपाट्याने वाढ