Odisha Train Accident : ओडिशामध्ये झालेल्या भीषण अपघाताचं कारण समोर आल्याची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. ओडिशाच्या बालासोरमध्ये दोन ट्रेन आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला. या दुर्दैवी अपघातात 288 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून 1000 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या रेल्वे अपघाताचं खरं कारण समोर आलं आहे. इलेक्ट्रॉनिक इंटर लॉकींग सिस्टीममुळे (Electronic Inter Locking System) घडल्याचं समोर आलं आहे. या सिग्नल यंत्रणेत काही बदल केल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. खुद्द केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी ही माहिती दिली. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी हे कारण शोधून काढल्याचं त्यांनी सांगितलं. सध्या रेल्वे सेवा पूर्ववत करण्यावर भर असल्याचंही रेल्वेमंत्री म्हणाले.


रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं अपघाताचं खरं कारण


रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Minister of Railways of India) यांनी सलग दुसऱ्या दिवशी ओडिशातील बालासोर रेल्वे अपघातस्थळी सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी रेल्वे अपघाताचं कारणही सांगितलं आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी केल्याचंही त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्र्यांनी म्हटलं आहे की, अपघाताचे कारण शोधण्यात आलं आहे. रेल्वेने जबाबदार असलेल्यांची ओळख पटली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमध्ये बदल झाल्यामुळे हा अपघात झाल्याचा मोठा खुलासा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे.


मानवी चुकीमुळे घडला अपघात?


ओडिशातील भीषण रेल्वे अपघातामागील खरं कारण समोर आलं आहे. प्राथमिक तपास अहवालानुसार, हा अपघात मानवी चुकीमुळे घडल्याचं समोर येत आहे. सिग्नल चुकल्याने शेकडो निरपराधांना प्राण गमवावे लागले. ओडिशाच्या बालासोरमध्ये शुक्रवारी तीन गाड्यांची भीषण टक्कर झाली होती. या दुर्घटनेत 288 जणांना जीव गमवावा लागला, तर मोठ्या संख्येने लोक जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, बहनगा बाजार स्थानकाजवळ सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास झालेला हा अपघात भारतीय रेल्वेच्या इतिहासातील चौथा सर्वात भीषण अपघात आहे.


हे ही वाचा : अपघातग्रस्त ट्रेनचे चालक आणि गार्डचं काय झालं? रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती


लवकर सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी अपघातस्थळाची पाहणी करुन जखमींची विचारपूस केली. पंतप्रधानांनी अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून त्यानुसार काम वेगाने सुरू असल्याची माहिती रेल्वे मंत्र्यांनी दिली आहे. रेल्वे मंत्री अश्निनी वैष्णव यांनी सांगितलं की, रेल्वे ट्रॅकचं काम जवळजवळ पूर्ण झालं आहे. आज एक ट्रॅक पूर्णपणे दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जाईल. बुधवारी सकाळपर्यंत रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर


रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे. सध्या 1000 हून अधिक कामगार दुरुस्तीच्या कामात गुंतले आहेत. पोकलेन मशी आणि क्रेन्सच्या साहाय्याने दोन्ही अपघातग्रस्त गाड्या आणि मालगाडी रेल्वे रुळावरून हटवण्यात आल्या आहेत.ढिगारा हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून रेल्वे रुळ दुरुस्तीसाठीही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.


या संबंधित इतर बातम्या :


Odisha Train Accident : ''कवचमुळे रेल्वे अपघात टाळता येईल'', रेल्वेमंत्र्यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, विरोधक आक्रमक; नक्की काय आहे ही यंत्रणा?