Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर येथे घडलेल्या भीषण रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 288 वर पोहोचली आहे. 1000 हून अधिक जखमींपैकी सुमारे 700 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला असून इतरांवर उपचार सुरु आहेत. 2 जून रोजी शुक्रवारी रात्रीच्या वेळेस हा अपघातात घडला. अपघातग्रस्त ट्रेनचे चालक आणि गार्ड यांच्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या दोन्ही गाड्यांचे चालक (Loco Pilot) आणि गार्ड जखमी झाले असून त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अपघातग्रस्त ट्रेनचे चालक आणि गार्डचं काय झालं?


या अपघातात मालगाडीचे इंजिन चालक आणि गार्ड थोडक्यात बचावले. मात्र, रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातातील जखमींच्या यादीत लोको पायलट आणि त्याचा साहाय्यक तसेच कोरोमंडल एक्स्प्रेसचा गार्ड आणि बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेसच्या गार्डचा समावेश आहे.


रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली 'ही' माहिती


दक्षिण पूर्व रेल्वेच्या खरगपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक राजेश कुमार म्हणाले, "कोरोमंडल एक्स्प्रेसचे लोको पायलट, साहाय्यक लोको पायलट आणि गार्ड तसेच बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसचे लोको पायलट आणि गार्ड यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत."


मृतांची संख्या वाढतीच


रेल्वे अपघातातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. ताज्या माहितीनुसार, आतापर्यंत 288 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 1000 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं माहिती समोर येत आहे.


रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू


बालासोरमध्ये रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरू असून, येथे दोन पॅसेंजर ट्रेन आणि एका मालगाडीचा भीषण अपघात झाला होता. सुमारे 1000 हून अधिक मजूर दुरुस्तीच्या कामात गुंतले आहे. अपघातग्रस्त ट्रेनच्या बोगी हटवण्यात आल्या असून एका बाजूने ट्रॅक जोडण्याचं काम सुरू असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वे सेवा पूर्ववत करण्यात येईल.


अपघात कसा घडला?


बालासोर येथील बहानगा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या भीषण रेल्वे अपघाताबाबत रेल्वेने चौकशी समिती स्थापन केली आहे. हा अपघात कसा घडला याबाबत साक्षीदारांचे जबाबही घेण्यात आले आहेत. रेल्वेच्या चौकशी समितीने दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, बाहेरच्या मार्गावर मालगाडी उभी होती. हावडाहून चेन्नईच्या दिशेने जाणारी कोरोमंडल एक्सप्रेस मेन लाईनऐवजी लूप लाइनवर गेली, जिथे ती आधीच थांबलेल्या मालगाडीला धडकली. 


प्राथमिक तपासणी अहवालात समोर आली माहिती


सुत्रांच्या माहितीनुसार, कोरोमंडल एक्सप्रेससाठी अप मेनलाइन सिग्नल देण्यात आला होता आणि नंतर तो काढून टाकण्यात आला होता. यामुळे गाडी लूप लाइनमध्ये घुसली आणि मालगाडीला धडकली. मालगाडीला धडकल्यानंतर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. यावेळी, बंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस डाऊन मेन लाइनवरून गेली आणि रुळावरून घसरलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसच्या डब्याला धडकल्याने तिचे दोन डबे उलटले, असं प्राथमिक तपासणी अहवालात समोर आलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Odisha Train Accident : 'कवच'मुळे भीषण अपघात टाळता आला असता, पण... रेल्वेमंत्र्यांच्या दाव्यावर विरोधकांचा निशाणा; नक्की काय आहे ही यंत्रणा?