Balasore Train Accident : ओडिशाच्या बालासोरमध्ये झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत 288 लोकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. घटनास्थळी ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. रेल्वे रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु आहे. या मार्गावरील 90 ट्रेन रद्द करण्यात आल्या असून इतर 46 गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला आहे. आज, 4 जून रोजी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ओडिशामधील परिस्थितीचा आढावा घेऊन जखमींची विचारपूस करणार आहेत. सध्या रुळांच्या दुरुस्तीचं काम सुरु असून सोमवारी, 5 जूनपर्यंत रेल्वे ट्रॅक दुरुस्त होण्याची शक्यता आहे.


ट्रेनचे अवशेष हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु


ओडिशातील ट्रेन अपघातावर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. एकीकडे ढिगारा हटवण्याचं काम सुरु असून दुसरीकडे रेल्वे ट्रॅक दुरुस्तीचं काम सुरु आहे. मजूरांकडून रात्रभर हे काम सुरु आहे. रुळाच्या दुरुस्तीचं काम लवकरात लवकर पूर्ण करून रेल्वे सेवा नियमितपणे सुरु करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. बालासोरमध्ये सध्या एक हजारहून अधिक मजूर अवशेष हटवण्याच्या कामात गुंतले आहेत. मजुरांसह 7 पोलकेन मशीन, 5 जेसीबी आणि 2 मोठ्या क्रेनसह ढिगार हटवण्याचं काम सुरु आहे. 


खुद्द रेल्वेमंत्र्यांकडून रात्रभर कामावर देखरेख


केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव हे शनिवारपासून अपघातस्थळी हजर आहे. ते शनिवारी रात्रभर प्रत्यक्ष हजर राहून उखडलेले रुळ दुरुस्त करण्याच्या कामावर लक्ष ठेऊन होते. त्याचे फोटोही समोर आले आहेत.






पंतप्रधान मोदींकडून घटनास्थळाची पाहणी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी रुग्णालयात जखमींचीही भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांनी अपघातावर शोक व्यक्त करताना  म्हटलं की, ही घटना अत्यंत गंभीर आहे. या प्रकरणातील दोषींना माफ केलं जाणार नाही. त्याचबरोबर जखमींच्या मदतीसाठी सरकार त्यांच्या पाठीशी आहे.


अपघातात 1175 लोक जखमी


ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या 288 झाली आहे. अपघातानंतर एकूण 1175 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यापैकी 793 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, तर 382 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे, तर इतर रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. दोन्ही एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आरक्षित तिकिटांसह 2,200 हून अधिक प्रवासी होते.


मृतांच्या नातेवाईकांसह जखमींना मदत जाहीर


दरम्यान, रेल्वेने या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 लाख रुपये, गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान मोदी यांनीही मदतीची घोषणा केली आहे. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपये अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. याशिवाय इतर अनेक राज्यांनीही मदत जाहीर केली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या


Coromandel Express Accident: ओडिशा रेल्वे अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू, 900 जण जखमी, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक