Balasore Train Accident : ओडिशातील बालासोर येथील भीषण अपघातात शेकडो जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. नेमकी चूक कुणाची यावरून अनेक सवाल करण्यात आले होते. आता या अपघातासंबंधित एका अहवालात नवीन धक्कादायक माहिती उघड झाली आहे. बालासोरचा भीषण रेल्वे अपघात टाळता आला असता, असं रेल्वे बोर्डाकडून अपघाताबाबत अहवाल दिलेल्या अहवालात समोर आलं आहे. अपघाताच्या तपासासाठी स्थापन केलेल्या समितीने अपघातासंदर्भात अहवालात अनेक बाबी उघड केल्या आहेत.


...तर बालासोर ट्रेन अपघात टाळता आला असता


पीटीआय वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, ट्रेन अपघातासंदर्भात तपास करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून या समितीने रेल्वे बोर्डाकडे दिलेल्या अहवालात अनेक धक्कादायक बाबींचा खुलासा केला आहे. या उच्चस्तरीय समितीने दिलेल्या अहवालानुसार, 'या अपघाताचं मुख्य कारण चुकीचा सिग्नल होता.' समितीने म्हटलं आहे की, सिग्नलिंग आणि दूरसंचार (S&T) विभागाकडून अनेक पातळीवर चुका झाल्या होत्या. आधीच्या इशाऱ्याकडे लक्ष दिलं असतं तर ही दुर्घटना टाळता आली असती, असंही उच्चस्तरीय समितीने म्हटलं आहे.


अहवालात काय म्हटलं आहे?


कमिशन ऑफ रेल्वे सेफ्टी (CRS) ने रेल्वे बोर्डाला सादर केलेल्या स्वतंत्र चौकशी अहवालात म्हटलं आहे की, "सिग्नलिंगच्या कामात कमतरता असल्यामुळे, अपघाताच्या ठिकाणी असलेल्या बहंगा बाजार येथील स्टेशन व्यवस्थापकाने S&T कर्मचाऱ्यांना दोन समांतर ट्रॅकमधील त्रुटींबाबत सूचना दिली असती, तर ते उपचारात्मक पावले उचलू शकले असते. बहनगा बाजार स्थानकावरील लेव्हल क्रॉसिंग गेट 94 वरील 'इलेक्ट्रिक लिफ्टिंग बॅरियर' बदलण्याच्या कामासाठी स्टेशन-विशिष्ट मंजूर सर्किट सर्किट आरेख न पुरवणे हे चुकीचे पाऊल होते, ज्यामुळे चुकीची वायरिंग झाली."


ओडिशा रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा 290 वर


ओडिशातील बालासोर येथे तीन ट्रेनची धडक होऊन भीषण अपघात घडला.  ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोर येथे 2 जून झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला तर, 1000 हून अधिक लोक गंभीर जखमी झाले. हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या अपघातांपैकी एक आहे. 


कोरोमंडल ट्रेन दुर्घटना कधी आणि कशी घडली?


कोरोमंडल एक्सप्रेस 2 जून रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास एका थांबलेल्या मालगाडीवर धडकली. अपघातात त्याचे बहुतांश डबे रुळावरून घसरले. त्यानंतर त्याचवेळी जाणाऱ्या बेंगळुरू-हावडा एक्स्प्रेसच्या डब्यांशी त्याचे काही डबे आदळून भीषण अपघात घडला.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


ओडिशा अपघातात 3 ट्रेनचा चक्काचूर, किती झालं नुकसान, एक ट्रेन तयार करायला किती खर्च येतो?