भुवनेश्वर: गेल्या आठवड्यापासून ओडिशातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानाला आग लागली असून ती आग विझवण्यासाठी आता ओडिशा सरकारने एका उच्च स्तरीय दलाला पाचारण केलं आहे. ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील सिमलीपाल राष्ट्रीय उद्यानातील आग काही केल्या नियंत्रणात येत नाही.


भारतातील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान असलेल्या ओडिशातील सिमलीपाल उद्यान आगीच्या भक्षस्थानी पडतंय. या राष्ट्रीय उद्यानातील 21 पैकी 8 रेंजमध्ये आग लागली आहे. भारतातील जैवविविधताच्या दृष्टीकोनातून हे राष्ट्रीय उद्यान अतिशय महत्वाचं आहे. या उद्यानाला गेले काही दिवस आग लागली असून त्याची चर्चा कुठेही होताना दिसत नाही. आता या प्रश्नावरुन केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी तात्काळ अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.


सिमलीपाल नॅशनल पार्क हे 5569 वर्ग किमी मध्ये पसरले आहे. या नॅशनल पार्कमध्ये एलिफंट रिझर्व्ह आणि टायगर रिझर्व्ह आहे. तसेच या उद्यानात बंगाल टायगर, आशियन हत्ती, गौर यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आढळते. युनेस्कोने 2009 साली सिमलीपालला वर्ल्ड नेटवर्क ऑफ बायोस्फीयर रिझर्व्हच्या लिस्टमध्ये सामिल करण्यात आलं आहे.


ऊसतोड करत नाहीत म्हणून शेतकऱ्यानं पेटवला ऊस, तर ही स्टंटबाजी असल्याचा कारखान्याचा पलटवार


सिमलीपाल हे जैवसंपत्तीची खाण आहे. जैवविविधतेच्या बाबतीत सिमलीपाल हे देशातील तिसरे सर्वात मोठे बायोस्पीयर रिझर्व्ह आहे. सिमलीपाल हे राष्ट्रीय उद्यान हत्ती आणि वाघांसाठी राखीव उद्यान आहे. या उद्यानात जवळपास वन्य पक्षांच्या 304 प्रजाती आहेत.


या उद्यानात अवैध्यपणे शिकारी केल्या जातात अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु असते. मयूरभंजच्या या जंगलात गेल्या आठवड्यात 50 किलो हत्ती दंत तस्करांकडे सापडले होते. या व्यतिरिक्त या जंगल परिसरात खाणकाम आणि अवैध्यपणे लाकडांची तस्करी करण्यात येते. त्याकडे प्रशासन डोळेझाक करते असा आरोप केला जातो.


फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या एका अहवालानुसार ओडिशातील जंगलात 22 फेब्रुवारी ते 1 मार्च या काळात 5,291 घटना नोंद करण्यात आल्या आहेत. फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाच्या मते ही आकडेवारी देशात सर्वाधिक आहे.


बांबू रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटरला लागलेल्या आगीतून संशयाचा धूर