अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील शेतक-याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाला आग लावली आहे. मुळा साखर कारखाना जाणीवपूर्वक ऊसतोड करत नसल्याचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले असून शेतकरी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपल्या समस्या मांडत आहे. 18 फेब्रुवारी रोजी पहिले ऊस ज्वलन आंदोलन झाल्यानंतर आज पुन्हा युवा शेतकरी ऋषीकेश शेटे याने आज आपल्या अडीच एकर क्षेत्रापैकी दीड एकर ऊस पेटवून दिला आहे.


नेवासा तालुक्यातील हनुमानवाडी येथील ऋषीकेश शेटे या शेतक-याने आपल्या ऊसाला आग लावली आहे. राजकीय विरोधक असल्याने मुळा सहकारी साखर कारखाना माझ्यावर अन्याय करत असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख , जलसंधारण‌ मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखाना चालवला जात असून अनेकदा ऊस नोंद करायला जाऊनही नोंद घेतली नसल्याचा आरोप ऋषिकेश शेटे या शेतकऱ्याने केला आहे.


दरम्यान या ऊस ज्वलन आंदोलनावरून सोशल मीडियावर सत्ताधारी विरुद्ध विरोधक आमने सामने आले आहे. साखर कारखाना व्यवस्थापणाने हे आरोप फेटाळले असून तारखेतील घोळ असल्यानं हा वाद निर्माण झाला असल्याबाबत पुरावे सोशल मीडियातून व्हायरल केले असून ऋषिकेश शेटे यांनी ऊस जाळण्याचा स्टंट केला असून ऊस जाळण्या पूर्वीच तो तोडला असल्या बाबत एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. तर शेतकऱ्याने पेटवलेल्या ऊसाचा व्हिडीओ राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटर हँडेल वरून शेअर करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.


 शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्या बेबंदशाहीला कंटाळून 19 फेब्रुवारी रोजी एका शेतकर्‍याने उस पेटविल्यानंतर आज आणखी एका शेतकर्‍याने आपल्या शेतातील उस पेटवून दिला. घाम गाळून कष्ट घेणार्‍या शेतकर्‍याला हाती आलेलं पीक पेटवून देताना काय वेदना झाल्या असतील. अनेक राज्य आणि राष्ट्रांचा भाषणप्रवास करणारे  मुख्यमंत्री किमान एकदा तरी मुळा साखर कारखान्याकडून होणार्‍या छळावर बोलणार का असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी  उपस्थित केला आहे.