चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील बांबू रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग सेंटर म्हणजे BRTC च्या इमारतीला गुरुवारी मोठी आग लागली होती. यामध्ये दोन इमारती पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. पण आता ही आग या इमारतींच्या बांधकामातील गैरप्रकार समोर येऊ नये यासाठी तर लावण्यात आली नाही ना याची दाट शक्यता वर्तविल्या जात आहे.


बांबूपासून तयार करण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या आणि सुंदर इमारतीचं हे संकल्प चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावाजवळ तयार होत असलेल्या या अतिशय सुंदर आणि भव्य प्रकल्पाचं काम जवळजवळ 90 टक्के पूर्ण झालं होतं. पण या प्रकल्पाला कोणाची तरी दृष्ट लागली आणि गुरुवारी दुपारी या प्रकल्पाला आग लागली आणि या आगीत दोन मोठ्या इमारती पूर्णपणे जळून नष्ट झाल्या तर प्रकल्पाचं मोठं नुकसान झालं. मात्र आता या विझलेल्या आगीतून संशयाचा धूर यायला सुरुवात झाली आहे आणि याला कारण ठरलंय चंद्रपूरच्या एका सामाजिक कार्यकर्त्याने या इमारतींच्या निकृष्ट दर्जाबद्दल करण्यात आलेली तक्रार.


सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांनी BRTC च्या इमारतींचं बांधकाम निकृष्ट दर्जाचं झाल्याची 10 डिसेंबर ला सार्वजनिक बांधकाम खात्याकडे तक्रार केली होती. विशेष म्हणजे त्यांनी या तक्रारीसोबत बांधकाम खराब असल्याचे पुरावे देखील दिले होते. याच आधारावर अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे यांनी 24 डिसेंबरला या तक्रारीच्या चौकशीचे आदेश दिले. मात्र दोन महिने लोटून देखील चौकशीचा अहवाल सादर झाला नाही आणि अचानक 25 फेब्रुवारीला BRTC ला आग लागली. त्यामुळेच हा घातपात तर नाही ना या दृष्टीने सीआयडी चौकशी करण्याची माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मागणी केली आहे.




BRTC ला लागलेल्या आगीची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने घटनास्थळाचा दौरा करून नुकसानीचा आढावा घेतला. मुख्य म्हणजे या प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनीच खुद्द प्रश्नचिन्ह उभं केलंय. कोणाचं पाप झाकण्यासाठी हे करण्यात आलंय हे मला दिसतंय अशा कठोर शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. सोबतच याची पूर्ण चौकशी होऊन दोषींवर नक्की गुन्हे दाखल होतील असं वक्तव्य वडेट्टीवार यांनी केलंय.



चिचपल्ली येथील BRTC ची बांबूने तयार होत असलेली ही इमारत चंद्रपूर जिल्ह्यासाठीच नाही तर आपल्या राज्यासाठी एक मोठं भूषण ठरणार होती. मात्र आगीच्या या घटनेमुळे प्रकल्पाला आणि पर्यायाने चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला मोठा धक्का बसलाय. त्यामुळे या आगीमागे नेमकं सत्य काय आहे हे पुढे आलंच पाहिजे.